जिनिव्हा - जगभरातील तब्बल १२६ कोटी लोक पाण्यासाठी महिलांवर अवलंबून असल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य संघटना-युनिसेफच्या अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, आजही जगभरात १८० कोटी लोक अशा घरांमध्ये राहतात जिथे पाण्याची व्यवस्था नाही. अशा घरांमध्ये १५ आणि त्याहून अधिक वयाच्या मुलींवर प्रामुख्याने पाणी आणण्याची जबाबदारी असते.अशा पहिल्याच अभ्यासानुसार, जगभरातील पाणीपुरवठा होत नसलेली १० पैकी सात कुटुंबे पाणी आणण्याची जबाबदारी महिलांवर ढकलतात. केवळ ३० टक्के कुटुंबातील पुरुष पाणी आणण्यासाठी मदत करतात. अहवालानुसार, जगात जसजसे जलसंकट वाढत जाईल, तसतसा त्याचा सर्वाधिक फटका महिलांना बसणार आहे.
भारतात काय स्थिती? भारतातील २६ टक्के घरांमध्ये अजूनही पाणीपुरवठा होत नाही आणि २० टक्के घरांमध्ये महिलांना पाणी आणावे लागते.या कामात तिची दररोज सुमारे २० मिनिटे वाया जातात. देशातील सर्वाधिक पाणी आणण्याची जबाबदारी राजस्थानच्या महिलांवर आहे. महिलांना घरात योग्य तो सन्मानही दिला जात नाही. त्यांना अशा नोकऱ्या दिल्या जातात ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात पुढील चांगल्या संधींची शक्यता कमी होते.
कोणत्या राज्यात मुलगी नकोशी?राजस्थान, पंजाब, बिहार, मध्य प्रदेश ही देशातील अशी राज्ये आहेत, जिथे महिलांना मुलगी जन्माला येऊ नये असे वाटते. या राज्यांतील पुरुषांमध्ये मात्र घरात मुलगी जन्माला यावी अशी इच्छा अधिक असते.
लैंगिक शोषणाची वाढती भीती१५ वर्षांखालील मुलींना पाणी आणण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे त्या शिक्षण, रोजगाराच्या संधींपासून वंचित राहतात. त्यांना दुखापत होण्याची आणि लैंगिक शोषणाची शक्यताही वाढते.