इस्लामाबाद : पाक लष्कराचे हेलिकॉप्टर पाकव्याप्त काश्मिरातील गिलगिटच्या पट्ट्यात संशयास्पदरीत्या कोसळले असून, त्यातील नॉर्वे व फिलिपाइन्सचे राजदूत व इतर पाच जण, असे सात जण ठार झाले आहेत. पाकिस्तानी तालिबानने हे हेलिकॉप्टर पाडल्याची जबाबदारी घेतली असून, पंतप्रधान नवाज शरीफ हेच आपले लक्ष्य होते, असा दावा केल्याने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. मात्र पाकिस्तान लष्कराने या हेलिकॉप्टर अपघातात दहशतवादी हल्ल्याचा वा घातपाताचा हात असल्याचा इन्कार केला आहे. तालिबानच्या खास गटाने पंतप्रधान नवाज शरीफ यांचे विमान पाडण्याचा कट केला होता; पण ते दुसऱ्या विमानातून आले त्यामुळे वाचले, असे तालिबानच्या निवेदनात म्हटले आहे. या दाव्याची सत्यता अद्याप गुलदस्त्यात आहे. पण गिलगिट बाल्टिस्तानात तालिबान प्रभावी नसल्याने दावा आणि अपघात या दोहोंविषयीचे गूढ वाढले आहे. पंतप्रधान नवाज शरीफ हे दोन प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी नल्तारला जाणार होते; पण त्यांच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर या अपघाताचे वृत्त आले. त्यामुळे त्यांचे विमान परत इस्लामाबादला नेण्यात आले. (वृत्तसंस्था)
दोन राजदूतांसह सात जण ठार
By admin | Published: May 09, 2015 2:34 AM