लंडन : हाँगकाँगमधील एका पित्याने आपल्या सात वर्षीय मुलीला भेट देण्यासाठी जगातील सर्वाधिक महागडा हिरा खरेदी केला आहे. या पित्याने ‘ब्लू मून’ नामक हा हिरा ४.८२ कोटी डॉलर अर्थात ३१९ कोटी रुपयांस खरेदी केला. जोसफ लाऊ असे या पित्याचे नाव आहे. चिनी उद्योगपती असलेल्या जोसफ यांनी जिनेव्हातील एका लिलावात ३१९ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून ब्लू मून आपल्या नावावर केला. हा हिरा मी माझ्या सात वर्षांच्या चिमुकलीला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या हिऱ्याचे नाव त्यांनी बदलून ‘द ब्लू मून आॅफ जोसफिन’ ठेवले आहे. २९.६२ कॅरेटचा हा दुर्लभ हिरा दक्षिण आफ्रिकेच्या कलिनन खाणीत गतवर्षी जानेवारीत सापडला होता. जगात सापडणाऱ्या हिऱ्यांमध्ये केवळ ०.१ टक्के ब्लू मून हिरे सापडतात. जिनेव्हातील सॉदेबी लिलावघराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ब्लू मून हिरा ४.८२ कोटी डॉलरमध्ये विकल्या गेला आहे. ही किंमत आत्तापर्यंत हिऱ्याला प्रति कॅरेटच्या हिशेबाने मिळालेली सर्वाधिक किंमत आहे. यापूर्वी हा विक्रम ‘ग्राफ पिक’ हिऱ्याच्या नावावर होता. ब्लू मून हिऱ्यास न्यूयॉर्कमध्ये पैलू पाडले गेले. यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. यानंतर तो १२.०३ कॅरेटचा झाला. सामान्यत: खाणीतून निघालेल्या हिऱ्यांवर डाग वा काही व्रण सापडतात. मात्र ब्लू मून डायमंडवर असे काहीही नाही.त्यामुळे अधिकृतरीत्या त्याला डागविरहित हिरा घोषित करण्यात आले आहे.
सात वर्षीय मुलीला जगातील सर्वाधिक महागड्या हिऱ्याची भेट
By admin | Published: November 13, 2015 12:10 AM