सातवीत शिकणारी ही चिमुकली गाते ८० भाषेत गाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 05:34 PM2017-11-18T17:34:43+5:302017-11-18T17:47:10+5:30
भारतीय वंशाची ही मुलगी मुळची केरळची असून ती आता दुबईत शिक्षण घेते आहे.
दुबई - आपले बोबडे उच्चार स्पष्ट करण्याच्या वयात एका मुलीने तब्बल 80 भाषेत गाणी गाण्याचा विक्रम केलाय. सुचेता सतीश असं या चिमुकलीचं नाव असून ती दुबईमधील इंडियन हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकते आहे. सुचेता आता आणखी एक नवा विक्रम करणार आहे. 29 डिसेंबर रोजी तब्बल 85 भाषेतील गाणं गाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणार आहे. त्यामुळे आणखी 5 भाषा तिला अवगत करायच्या असून अगदी कमी वेळात या 5 भाषांचा ती अभ्यास करणार आहे.
आता तुम्हाला वाटेल की सुचेता अगदी लहानपणापासून गाण्याचा रियाझ करत असेल, पण तसंही अजिबात नाहीए. गेल्या वर्षाभरापासूनच तिने गाणं शिकायला सुरुवात केलीय. वर्षभरात गाणं शिकून एवढ्या भाषा आत्मसात करणं फार आव्हानात्मक असल्याने तिच्या या कलेविषयी सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुचेता ही मुळची केरळची असून तिला भारतीय भाषाही येतात. हिंदी, मल्याळम आणि तामिळ या तीन भारतीय भाषांचा त्यात समावेश आहे. तर, जपानी आणि इंग्रजी या दोन जागतिक भाषाही तिला येतात. सुचिताच्या वडिलांचे जपानी मित्र एकदा घरी आले असता तिने त्यांच्याकडून जपानी भाषा शिकून घेतली होती.
भाषेचे उच्चार सोपे असतील तर गाणं शिकायला फक्त 2 तास लागतात, पण उच्चार कठीण असतील तर थोडा वेळ लागतो. मात्र काही उच्चार फार सोपे असतात, त्यामुळे तासाभरात त्या भाषेतील गाणं शिकता येतं, असं सुचेता सांगते. जास्त भाषेत गाणं सादर करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याआधीही एका गायकाची नोंद झाली आहे. केसिराजू श्रीनिवास असं त्या गायकाचं नाव असून त्याने 76 भाषेत गाणं गाऊन आपलं नाव गिनीज बुकमध्ये कोरलं होतं. आता सुचेता या पुरस्कारासाठी तयारी करत असून तिने 85 भाषांचं लक्ष ठेवलं आहे. त्यातील 80 भाषा तिला येत असून 5 भाषांचा अभ्यास सुरू असल्याचं ती सांगते.
सौजन्य - www.gdnonline.com