अफगाणिस्तानमध्ये एका मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. येथील मजार-ए-शरीफ मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुजमध्येही स्फोट झाले आहेत.
मशिदीत झालेल्या या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.तसेच, अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, 4 स्फोट झाल्याने अफगाणिस्तान हादरला आहे.
अबू अली सिना बाल्की जिल्हा रुग्णालयाचे प्रमुख घोसुद्दीन अन्वारी यांनी सांगितले की, अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, जखमींचा नेमका आकडा सांगण्यास त्यांनी नकार दिला असून जखमींची संख्या नंतर अपडेट केली जाईल, असे सांगितले.
दरम्यान, पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या नांगरहारमध्ये झालेल्या स्फोटात चार जवानांचा मृत्यू झाल्याचीही पुष्टी झाली आहे. विशेष म्हणजे रमजानच्या महिन्यात अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत, ज्यामध्ये अनेक निष्पाप जीव गेले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत.