वाशिंग्टन : अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे रविवारी संध्याकाळी ख्रिसमसच्या परेडमध्ये (Waukesha Christmas parade) एक कार घुसली. या घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. येथील वाउकेशाच्या मिल्वौकीमध्ये झालेल्या या घटनेची तपास अधिकारी अद्याप करत आहेत.
ही घटना रविवारी संध्याकाळी 4:30 वाजता घडली. वाउकेशाच्या मिल्वौकीमध्ये आयोजित वार्षिक परंपरा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी पत्रकारांना सांगितले की, "लाल रंगाची एसयूव्ही कार ख्रिसमसच्या परेडमध्ये घुसली. त्यावेळी आम्ही शहराच्या मध्यभागी होतो. या घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत."
वाउकेशा पोलीस विभागाने एक संशयास्पद कार जप्त केली आहे. त्याचा तपास सुरू आहे, असेही पोलीस प्रमुख डॅन थॉम्पसन यांनी सांगितले. यासोबतच एका संशयित व्यक्तीची ओळख पटली आहे. विस्कॉन्सिन राज्य कोषाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अँजेलिटो टेनोरिओ देखील परेडमध्ये होते आणि त्यांनी मिल्वौकी जर्नल सेंटिनेलला सांगितले की, आम्ही एक एसयूव्ही जवळून जाताना पाहिली आणि नंतर आम्हाला मोठा आवाज ऐकू आला. यानंतर बसमध्ये लोकांच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला, जी गाडीला धडकली होती, असे अँजेलिटो टेनोरिओ म्हणाले.
दरम्यान, या घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. जर्नल सेंटिनेलने सांगितले की, फुटेजमध्ये एसयूव्ही कार शाळेच्या मार्चिंग बँडच्या मागून परेडमध्ये वेगाने जात असल्याचे दिसून आले.