नवी दिल्ली, दि. 15 - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद अफ्रिदीने 71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. शाहिद अफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देत शांततेसाठी आवाहन केलं आहे. आपण आपला शेजारी बदलू शकत नाही असं सांगत शांतता, सहिष्णुता आणि दोन्ही देशांमधील प्रेम वाढावं यासाठी शाहिद अफ्रिदीने आवाहन केलं आहे. आज देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पाकिस्ताननेही 14 ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
आणखी वाचाIndependence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिनस्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे
शाहिद अफ्रिदीने ट्विट करताना लिहिलं आहे की, 'भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. आपण कोणत्याही परिस्थितीत आपला शेजारी बदलू शकत नाही. शांतता, सहिष्णुता आणि दोन्ही देशांमधील प्रेमा वाढावं यासाठी एकत्र काम करुया. माणुसकीचा विजय होऊ दे'.
पाकिस्तानात 14 ऑगस्टला तर भारतात 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो. दोन्ही देशांमध्ये फक्त 24 तासांचं अंतर असतं. एकीकडे दोन्ही देशांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु असताना, अनेकदा युद्दालाही सामोरं जावं लागलं आहे. 70 वर्षांचे हे नातं अनेकदा फिस्कटलं आहे. सध्याच्या घडीला भारत आणि पाकिस्तानात प्रचंड तणाव सुरु आहे. उरी हल्ल्यानंतर सुरु झालेला हा तणाव अद्याप सुरु असून इतक्या लवकर तो कमी होईल याची शक्यता फार कमी आहे.
इंजिन गुगलनेही भारतीयांना 71 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलने डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल नेहमीच महत्वाचे दिवस, सण असले की डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतो. गुगलनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने खास डुडल तयार केलं आहे. गुगलच्या या डुडलमध्ये भारताचं संसद भवन तिरंगी रंगात दाखवण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लाल किल्ल्यावरुन सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.