ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ४ - शाहरुख खान राष्ट्रविरोधी असल्याची मुक्ताफळं भाजपा नेते विजयवर्गीय यांनी उधळल्याने वाद निर्माण झाला असतानाच पाकिस्तानमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदनेही या वादात उडी घेतली आहे. भारतात भेदभाव आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागणा-या शाहरुख खानने पाकिस्तानमध्ये येऊन राहावे, असे सांगत हाफिजने शाहरुखला पाकमध्ये येण्याचे निमंत्रणच दिले आहे.
देशात असहिष्णूता वाढल्याचे विधान शाहरुख खानने सोमवारी केले होते. शाहरुखच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांची जीभ घसरली आणि नवा वाद निर्माण झाला. विजयवर्गीय यांनी शाहरुख राष्ट्रविरोधी असल्याचे म्हटले असून विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनीदेखील शाहरुख पाकिस्तानचा एजट असल्याचे बेताल विधान केले आहे. शाहरुखवर टीका सुरु होताच पाकिस्तानमध्ये बसलेल्या हाफिज सईदने शाहरुखच्या समर्थनार्थ टिवटिवाट केला आहे.
'भारतात राहणा-या विचारवंतांनी हिंदूत्ववाद्यांच्या असहिष्णूतेविरोधात आवाज उठवला यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. ही मंडळी कधी पाकमध्ये आली तर त्यांना जमात उद दावाच्या शिबीरांमध्ये अल्पसंख्यांकासाठी चालवल्या जाणा-या योजना दाखवू. भारतात क्रीडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मुस्लिमांना अजूनही स्वतःची ओळख जपण्यासाठी झगडावे लागते. शाहरुख असो किंवा अन्य कोणताही मुसलमान ज्यांना भेदभावाचा फटका बसतोय त्यांनी पाकिस्तामध्ये येऊन राहावे असे सईदने म्हटले आहे.