इस्लमाबाद, दि. 28 -बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं. नवाज शरीफ यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय येताच पाकिस्तानच्या शेअर मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज (पीएसएक्स) अवघ्या 3 मिनिटात तब्बल 1100 अंकांनी कोसळला. पाकिस्तानी वृत्तपत्र दुनिया न्यूजनुसार या तीन मिनिटांमध्ये जवळपास 200 पाकिस्तानी कंपन्यांच्या शेअर्सना त्याचा जबर फटका बसला आणि 20 हजार कोटी रूपये अक्षरशः स्वाहा झाले (मार्केट कॅपिटलायझेशन). न्यायालयाचा निर्णय येणार याची कल्पना असल्यामुळे शेअर मार्केटमध्ये सुरूवातीपासूनच थंड प्रतिसाद होता.
नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन हटवलं, पाकिस्तानात राजकीय भूकंप
नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं आहे. पनामागेट प्रकरणात अडकलेल्या नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तसंच अर्थमंत्री इशाक दार यांनाही पदावरुन हटवलं आहे.
पंतप्रधानपदावर असताना नवाज शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. मागील वर्षी पनामा पेपर लीकमुळे याचा खुलासा झाला होता. संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) नवाज शरीफ प्रकरणाचा तपास केला होता. जेआयटीच्या अहवलात शरीफ आणि कुटुंबीयांवरील आरोप योग्य असल्याचं सिद्ध झालं होतं.
भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नवाज शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी 11:30 वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आणि दुपारी 12.30 च्या सुमारास न्यायालायने निकाल दिला.
काय आहे पनामागेट प्रकरण?
श्रीमंत व धनाढ्य नागरिक स्वत:ची संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे टॅक्स चोरतात? काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेने काम करणा-या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने समोर आली होती. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण , धनाढ्य व्यक्ती,उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत ५०० भारतीयांचीही नावेदेखील आहेत.
मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा सफेद करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशा प्रकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली होती.
ही कागदपत्रे लीक झाल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ, सीरियामधील राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशाप्रकारे पनामाची मदत घेतली ही माहिती समोर आली होती. एकीकडे जगभरातील इतकी मोठे नावे समोर आली असताना रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचं नावदेखील समोर आलं होते. ब्लादिमीर पुतिन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचादेखील यामध्ये समावेश आहे.