Pakistan Election :पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या, तर पाकिस्तानीनिवडणूक आयोगाने रविवारी अंतिम निकाल जाहीर केले. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. देशात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक अपक्ष उमदेवार निवडून आल्यामुळे सत्ता स्थापनेचा गुंता आणखीनच वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थित 101 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत, तर तीन वेळा माजी पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाने 75 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, बिलावल झरदारी भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) 54 जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा इतर छोट्या-मोठ्या पक्षांनी जिंकल्या आहेत. तांत्रिकदृष्ट्या 75 जागा जिंकून PML-N संसदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.
असा असेल फॉर्म्युला...निकालानंतर पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेचे प्रयत्न आता तीव्र झाले आहेत. पीएमएल-एनचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी इतर पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी धाकटे भाऊ आणि माजी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यावर सोपवली आहे. शेहबाज यांनी बिलावल भुट्टो आणि आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली असून, सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शेहबाज शरीफ पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात. तर झरदारी यांना राष्ट्रपतीपद मिळू शकते.
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये 266 जागांवर थेट मतदानाद्वारे प्रतिनिधी निवडले जातात. त्यापैकी 265 जागांवर निवडणूक झाली. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने (ECP) यापैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला थेट मतदानाद्वारे निवडून आलेल्या 133 सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. तर, एकूण 336 पैकी 169 जागांची आवश्यकता आहे, ज्यामध्ये महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव जागांचाही समावेश आहे.