वॉशिंग्टन : पंतप्रधान नवाज शरीफ यांचा अमेरिकेचा दौरा पाकिस्तानमधील लोकशाहीसाठी फार काही उपयुक्त सिद्ध होणार नाही. तेथील लष्कर आणि मुलकी प्रशासन यांच्यातील वाढता असमतोल लोकशाहीला धोका निर्माण करीत आहे, असे अमेरिकेच्या तज्ज्ञाने म्हटले.अमेरिकेतील वैचारिक संस्था वुड्रो विल्सन इंटरनॅशनल सेंटर फॉर स्कॉलर्सचे मायकेल कुगेलमॅन यांनी ‘फॉरिन पॉलिसी’ नियतकालिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, शरीफ यांच्या चार दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात अध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांच्या होणाऱ्या चर्चेचा मुख्य मुद्दा सुरक्षेचा असेल. पाकिस्तानी लष्कराने सत्तेवर पकड निर्माण केली असून, त्या लष्करालाच हा दौरा आणखी बळकट करणार आहे. लोकशाहीला बळकट करण्याच्या प्रयत्नांनंतरही अनियंत्रित अशी सत्ता असलेली संस्था पाकिस्तानने बनावे यासाठीच अमेरिका मदत करते, असे कुगेलमॅन यांनी म्हटले.‘पाकिस्तानने स्वत:ला विश्वासघातकी सिद्ध केले’पाकिस्तानने स्वत:ला पुन:पुन्हा विश्वासघातकी व कावेबाज सिद्ध केले आहे, असे अमेरिकन संसदेचे ज्येष्ठ सदस्य टेड पो यांनी म्हटले. पाकिस्तानशी अमेरिकेने नागरी अण्वस्त्र करार करू नये, असे आवाहनही त्यांनी अध्यक्ष बराक ओबामा यांना केले आहे.दहशतवाद आणि अण्वस्त्रांचा प्रसार रोखण्यासाठीच्या काँग्रेसच्या उपसमितीचे अध्यक्ष असलेले पो यांनी वरील आवाहन केलेले पत्र मंगळवारी ओबामा यांना लिहिले. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तान फक्त अफगाणिस्तानात असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले करणाऱ्या दहशतवादी संघटनांनाच आश्रय देतोय असे नाही, तर इराणसारख्या देशांशी पूर्वी करण्यात आलेल्या अणुकराराबाबतही तो प्रामाणिक राहिलेला नाही.
‘शरीफ यांचा अमेरिका दौरा लोकशाहीसाठी निरुपयोगी’
By admin | Published: October 23, 2015 2:58 AM