झाशी : भारतात अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. मात्र, एक असेही मंदिर आहे जेथे श्वानाची पूजा होते. झाशीपासून ६५ कि.मी. अंतरावरील रेवन आणि ककवारा गावांदरम्यान हे मंदिर आहे. जेथे या श्वानाचा मृत्यू होऊन त्याला पुरण्यात आले होते त्याच ठिकाणी त्याचे मंदिर उभारण्यात आले आहे, असे स्थानिकांनी सांगितले. या श्वानाला पुरण्यात आल्यानंतर ही जागा आपोआप दगडाप्रमाणे टणक बनली होती. निवडणुकीच्या वेळीही लोक या मंदिरासमोर दोन मिनिटे थांबून माथा टेकवतात. येथील महिला या मंदिरात जलाभिषेक करण्यासह श्वानाची पूजा करतात. या मंदिराला कुतिया महाराणीचे मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिरात काळ्या रंगाची श्वानाची मूर्ती आहे. लोक या श्वानाला कुतिया देवी म्हणून पूजतात. ‘एकदा दोन्ही गावांत एकाच दिवशी पंगत होती. पंगतीदरम्यान रमतुला वाजविला जाई. त्यामुळे लोकांना पंगत सुरू झाल्याचे कळे. रेवन गावात रमतुला वाजल्यानंतर हा श्वान तिकडे निघाला. मात्र, तो पोहोचेपर्यंत तेथील पंगत संपली होती. थोड्या वेळाने ककवार गावात रमतुला वाजला. मात्र, तेथेही तेच झाले. हा श्वान आजारी आणि उपाशी होता. दोन्ही गावांदरम्यान पळाल्यामुळे तो थकून एके ठिकाणी बसला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. त्याला पुरल्यानंतर ती जागा दगड बनली’, असे गावातील ज्येष्ठ नागरिक श्याम लाल यांनी सांगितले.
श्वानाचे मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 12:19 AM