Sheikh Hasina, Bangladesh Violence : बांगलादेशच्या अवामी लीगच्या अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातील वाढत्या हिंसाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. चितगाव येथील वकिलाच्या हत्येचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आणि या घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना तातडीने पकडून शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली. देशातील जनतेला दहशतवादाविरोधात उभे राहण्याचे आवाहन करतानाच शेख हसिना यांनी चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचाही निषेध व्यक्त विरोध केला. चिन्मय दास यांना लवकरात लवकर सोडण्यात यावे, अशीही माजी पंतप्रधानांनी मागणी केली.
वकिलाची हत्या म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन
शेख हसीना यांनी बांगलादेशातील आंदोलनादरम्यान मारले गेलेले सरकारी वकील सैफुल इस्लाम यांची हत्या म्हणजे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असल्याचे म्हटले. व्यावसायिक कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या एका वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली. हे दहशतवादी कृत्य असून यामध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले. शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारवर निशाणा साधला. जर हे सरकार दोषींना शिक्षा करण्यात अपयशी ठरले तर मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबतही त्यांना उत्तर द्यावे लागेल, असे त्या म्हणाल्या.
देशातील अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यांचा शेख हसीना यांनी निषेध केला. चॅटगावमधील मंदिर जाळण्याच्या घटनेचा संदर्भ देत, हसीना म्हणाल्या की सर्व समुदायांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत महत्वाचे आहे. सत्ता बळकावणारे लोक प्रत्येक क्षेत्रात अपयशी ठरत आहेत. त्यांना ना मूलभूत गोष्टींचा पुरवठा होतो ना, सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची हमी मिळते. सर्वसामान्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होत असलेल्या या अत्याचारांचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
चिन्मय कृष्ण दासच्या सुटकेची मागणी
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सांगितले की, सनातन धर्माच्या एका सर्वोच्च नेत्याला अन्यायकारकरित्या अटक करण्यात आली आहे. चिन्मय दासची तात्काळ सुटका करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईवरही त्यांनी आक्षेप व्यक्त करून त्यांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे. शेख हसीना यांनी या कारवायांना न्यायविरोधी म्हटले आहे.