ढाका: बांगलादेशच्यापंतप्रधानपदी पुन्हा शेख हसीना विराजमान होणार आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पक्ष अवामी लीगने रविवारी सलग चौथ्यांदा बाजी मारली. मुख्य विरोधी पक्ष बीएनपी व त्याच्या मित्र पक्षांनी बहिष्कार घातलेल्या या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने दोनतृतीयांश जागा जिंकल्या आहेत. रविवारी दिवसभर चाललेल्या मतदानानंतर मतमोजणी सुरू असताना संसदेच्या ३०० पैकी २०० जागांवर हसीना यांच्या पक्षाने विजयश्री मिळवली. हसीना यांच्या नेतृत्वाखाली अवामी लिगने निवडणुकीत बाजी मारण्याची ही सलग चौथी आणि एकूण पाचवी वेळ आहे.
हिंसाचाराच्या काही घटना आणि विरोधी पक्ष बांगलादेश नॅशलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) बहिष्कारासह रविवारी बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीकडे मतदारांनी पाठ फिरविली. दुपारी चार वाजेपर्यंत केवळ ४० टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याने ७ केंद्रांवरील मतदान थांबविण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी ४ वाजता संपले. अनेक मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नसल्याने आलेल्या मतदारांना सहजरित्या मतदान करता आले, असे निवडणूक आयोगाचे सचिव मोहम्मद जहांगीर आलम यांनी सांगितले.
आज निकाल
निवडणुकीचा निकाल आज, ८ जानेवारीला लागणार आहे. परंतु विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने सत्ताधारी अवामी लीगचा विजय निश्चित मानला जात आहे.
शेख हसीना यांनी केले मतदान
पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सिटी कॉलेजच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मुलगी साइमा वाजिद त्यांच्यासोबत उपस्थित होती. २००९ पासून हसीना या सत्तेत आहेत. आताच्या निवडणुकीत विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्याने त्या चौथ्यांदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे.
निष्पक्ष निवडणुकीची अपेक्षा नाही : बीएनपी
शेख हसीना यांच्या अवामी लीगकडून निष्पक्ष निवडणुकीची अपेक्षा नाही. निवडणुकीपूर्वी सरकारने विरोधी पक्षाच्या हजारो नेते, कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे बीएनपीचे मुख्य प्रवक्ते रूहुल कबीर रिजवी यांनी स्पष्ट केले.
- ४२,००० पेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदान झाले
- ३०० पैकी २९९ मतदारसंघात मतदान
- २७ रिंगणात
- १५०० हून अधिक राजकीय पक्षांचे उमेदवार
- ४३६ अपक्ष उमेदवार
- ३ भारतीयांसह १०० हून अधिक विदेश पर्यवेक्षक नियुक्त केले होते.
- ७.५ लाखांहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.
विरोधकांनी बहिष्कार का टाकला?
- प्रमुख विरोधी पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकत ६ जानेवारीला सकाळी ६ ते ८ जानेवारी सकाळी ६ पर्यंत देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
- सध्याच्या सरकारच्या काळात कोणतीही निवडणूक निष्पक्ष आणि विश्वासार्ह होणार नाही, असा पक्षाचा दावा आहे.
- या बेकायदेशीर सरकारचा राजीनामा, तटस्थ सरकारची स्थापना आणि तुरुंगातून सर्व पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुटका करण्याची मागणी करणे हा संपाचा उद्देश असल्याचे बीएनपीचे मुख्य प्रवक्ते रुहुल कबीर रिजवी यांनी स्पष्ट केले.
- इतर १५ राजकीय पक्षांनीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला.
हिंसाचार घटना किती?
- नरसिंगडी आणि नारायणगंज येथील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी उद्योगमंत्री नुरुल माजिद महमूद हुमायूं यांचे मुलाला अटक करण्यात आली.
- चट्टोग्राम मतदारसंघातील दोन उमेदवारांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादात गोळीबार झाला. त्यात दोघे जखमी झाले आहे.
- जमालपूरच्या शरिशाबाडी मतदानकेंद्रावर अवामी लीग व अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारीत दोघे जखमी झाले.
- ढाक्याच्या हजारीबाग केंद्राजवळ दोन किरकोळ बॉम्बस्फोट झाल्याने एका मुलासह चौघे जखमी झाले.