गेल्या काही दिवसापासून बांगलादेशात नोकरीतील आरक्षणामुळे गोंधळ सुरू आहे. शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. त्यांनी देशही सोडला आहे, सध्या त्या भारतात वास्तव्यास आहेत. शेख हसीना यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हा निर्णय घेतला आहे.
'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन
शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांना बांगलादेशही सोडावे लागले. तेव्हापासून शेख हसीना भारतात राहत आहेत. मात्र, आता डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केल्यानंतर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने त्यांचा राजनैतिक पासपोर्ट अशा वेळी रद्द केला आहे जेव्हा संयुक्त राष्ट्र संघाचे एक पथक कथित मानवाधिकार उल्लंघनाच्या चौकशीसाठी ढाका येथे पोहोचले होते. बांगलादेशातील हिंसाचारात ४५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. काही मृत्यूंप्रकरणी शेख हसिना यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आता बांगलादेशच्या नवीन सरकारने शेख हसीना यांच्याविरोधात कारवाई केली. गृह मंत्रालयाने सांगितले की, शेख हसीना आणि त्यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या नेत्यांचे आणि खासदारांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर संसदही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे सर्वांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान, त्यांचे सल्लागार, माजी कॅबिनेट मंत्री आणि खासदारांना त्यांचे राजनैतिक पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे. हाच नियम त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही लागू होतो. म्हणजेच शेख हसीना यांच्या कुटुंबातील ज्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे, त्यांना तो जमा करावा लागणार आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिप्लोमॅटिक पासपोर्ट जमा केल्यानंतर ते सामान्य पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. दोन सुरक्षा यंत्रणांच्या मान्यतेनंतर त्यांना सामान्य पासपोर्ट दिला जाईल.