नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करुन बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे अभिनंदन केले आहे. बांग्लादेशमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजयाची पुनरावृत्ती केल्याबद्दल आपले अभिनंदन. बांग्लादेशच्या विकासासाठी भारत नेहमीच आपल्यासोबत असेल, उभय देशांतील संबंध आणखी मजबूत होतील, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला आहे. या विजयासह चौथ्यांदा बांग्लादेशमध्ये सत्ता मिळविण्यात शेख हसीना यांना यश आलं आहे.
बांग्लादेशमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. बांग्लादेशच्या 11 व्या संसदेसाठी रविवारी झालेल्या रक्तरंजित मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीगचे सरकार सलग चौथ्यांदा सत्तेवर आले आहे. येथे मतदानाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात 17 जणांचा मृत्यू झाला, तर पन्नासहून अधिक जखमी झाले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) या प्रमुख विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर मतदानात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत निवडणुकीचे निकाल अमान्य केले आहेत.
एका मतदारसंघातील उमेदवाराचे निधन झाल्याने 300 पैकी 299 जागांसाठी मतदान झाले. सायंकाळी मतदान संपताच मतमोजणीस सुरुवात झाली. त्यावेळी, स्वत: शेख हसीना यांनीही मतदान केल्यानंतर देशातील लोकांना विकास हवा असल्याने ते पुन्हा आम्हालाच निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला होता. देशात अनेक ठिकाणी अवामी लीग व ‘बीएनपी’च्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. दिवसभरात मरण पावलेल्या 19 जणांपैकी 8 अवामी लीगचे, तर 11 ‘बीएनपी’चे समर्थक असल्याचे समजते. स्वत: खालिदा झिया यांच्यावर निवडणूकबंदी असल्याने त्या निवडणूक रिंगणात नव्हत्या; परंतु पंतप्रधान शेख हसीना यांचे वडील व बांगलादेशच्या स्वातंत्र्याचे शिल्पकार वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांचे ज्येष्ठ सहकारी व विख्यात कायदेतज्ज्ञ कमाल होसेन यांनी सुमारे 40 वर्षांचा राजकारण संन्यास सोडून शेख हसीना यांच्या ‘भ्रष्ट’ सरकारपासून देशाला मुक्ती देण्यासाठी दंड थोपटले होते. मात्र, जनतेनं त्यांना स्पष्ट नाकारलं आहे.