संयुक्त अरब अमिरातचे (UAE) राष्ट्रपती शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान (Sheikh Khalifa Bin Zayed Al Nahyan) यांचे शुक्रवारी (दि.13) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर आता यूएईच्या राष्ट्रपती पदाची सुत्रे कोणाकडे दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता युएईचे राष्ट्रपती म्हणून शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Sheikh Mohamed bin Zayed Al Nahyan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती WAM न्यूज एजन्सीने दिली आहे. दरम्यान, शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे यूएईचे तिसरे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे 17 वे शासक म्हणून काम पाहणार आहेत.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान 73 वर्षांचे होते आणि ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या निधनानंतर सरकारने 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. याशिवाय, देशातील सर्व खासगी आणि सरकारी क्षेत्रात तीन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी 3 नोव्हेंबर 2004 पासून देशाचे राष्ट्रपती आणि अबू धाबीचे शासक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्याआधी त्यांचे वडील शेख झायेद बिन सुलतान अल नाहयान राष्ट्रपती होते.
शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी आपल्या कार्यकाळात यूएई आणि अबू धाबीच्या प्रशासनाची पुनर्रचना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि अनेक सुधारणा अंमलात आणल्या. शेख खलिफा बिन झायेद अल नाहयान यांनी युएईला वायू आणि तेल क्षेत्रात प्रगती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय, इतर उद्योगही त्यांच्या कारकीर्दीत विकसित झाले. विशेषतः यूएईच्या उत्तरेकडील प्रदेशांच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, जे इतर भागांच्या तुलनेत किंचित मागासलेले होते. या परिसारात त्यांनी गृहनिर्माण, शिक्षण आणि सामाजिक सेवांचा प्रसार करण्याचे काम केले. त्यांनी यूएईमधील फेडरल नॅशनल कौन्सिलच्या सदस्यांची थेट निवडणूक देखील सुरू केली होती.