गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात अराजकता पसरली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू होता. ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी बांगलादेशच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आणि शेख हसीना यांचे वडील असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळाही सोडला नाही. आंदोलकांनी ढाका येथील बंगबंधू शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली.
बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळख असलेले शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्यावर चढून आंदोलकांनी हातोडा मारून मोडतोड केली. शेख मुजीबुर रेहमान यांनी बांगलादेशासाठी पाकिस्तानविरोधात सशस्त्र लढा दिला होता. त्यांच्या या लढ्यामुळे बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, आता आपल्याच देशात शेख मुजीबुर रहमान यांच्याबद्दलच्या अशा द्वेषानं जगाला धक्का बसला. या घटनेमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले. आता बांगलादेशच्या टका चलनावरही बंगबंधूं शेख मुजीबुर रेहमान यांचा फोटो आहे, त्यामुळं येथील नवीन सरकार नोट बदलणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. जास्तकरून नोटा बदलण्याची चिंता भारत-बांगलादेश सीमेवर असलेल्या पैशांची देवाणघेवाण करणाऱ्या लोकांमध्ये आहे.
एका अंदाजानुसार, भारतातील मनी एक्स्चेंज व्यापाऱ्यांकडे करोडो टका आहेत, ज्याची ते कमिशनने देवाणघेवाण करतात. सध्या दोन्ही देशांमधील सीमेवरील व्यापार ठप्प असून, टका बदलून रुपयाची देवाणघेवाण करणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. मात्र, बांगलादेश-भारत सीमेवरील मनी एक्स्चेंजर्स बांगलादेशमध्ये होत असलेल्या राजकीय गोंधळामुळे चिंतेत आहेत. मनी एक्सचेंजर्स टकाचे भारतीय चलनात आणि रुपयाचे बांगलादेशी चलन टकामध्ये रूपांतर करतात. त्यांचा व्यवसाय १०० रुपयांच्या बदल्यात ७० टका अशा हिशोबाने चालतो. मात्र गेल्या पाच दिवसांपासून त्यांचा व्यवसाय ठप्प आहे.
पेट्रापोल सीमेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे टेलीव्हिजनवर शेख मुजीबुर रेहमान यांचा पुतळा पाडताना पाहत आहेत, त्यावरून असे दिसतं की, येणारं नवीन सरकार टकावर बंदी घालेल. दरम्यान, गौरांगा घोष या व्यावसायिकाने सांगितले की, सोमवारपासून त्यांच्या दुकानात कोणीही चलन बदलण्यासाठी आलेले नाही. पूर्वी रोज ७०-८० लोक यायचे, गेल्या चार दिवसांत एक ग्राहक आला. नोटा बदलून न दिल्याने उत्पन्न थांबले असतानाच, तोट्याची भीती सतावू लागली आहे. आता व्यावसायिकांना बांगलादेश टका लवकरात लवकर संपवायचा आहे.
पेट्रापोल क्लिअरिंग एजंट्स स्टाफ वेल्फेअर असोसिएशनचे सचिव कार्तिक चक्रवर्ती यांनी लँड पोर्ट ऑथॉरिटी आणि सीमा सुरक्षा दलाच्या परवानगीनंतर दोन्ही देशांमधील व्यापार लवकरच सुरू होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. सीमेवर उभ्या असलेल्या ट्रकची ये-जा सुरू झाली, तर चलन विनिमय करणाऱ्या लोकांची चिंता दूर होईल. बांगलादेशात जाणारे भारतीय व्यापारी खरेदीसाठी टका घेतात. तसेच, छोट्या गरजांसाठी ट्रकवाले बांगलादेशी चलनही घेतात.