इस्लामाबाद: दुबईत खेळल्या गेलेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील (T20 World Cup Ind vs Pak) सामन्यात पाकिस्ताननेभारतावर १० गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर पाकिस्तानमध्ये हर्षोल्लासाचे वातावरण पाहायला मिळाले. भारताच्या या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तानमधील नेतेमंडळींनीही सोशल मीडियावरून पाकिस्तानच्या टीमला शुभेच्छा दिल्या. यात पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी भारतातील मुस्लिमांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या, असे म्हटले आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या संघाने भारताचा धुव्वा उडवला. यानंतर गृहमंत्री शेख रशीद यांनी सोशल मीडियावर एक ११ सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत टी-२० वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धचा सामना जिंकल्याबाबत पाकिस्तानच्या टीमचे अभिनंदन करत अनेक शुभेच्छा दिल्या.
भारतातील मुस्लिमांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या
पाकिस्तानच्या टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा. ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या टीमने शिकस्त दिली आहे, त्याला सलाम करतो. पाकिस्तानच्या टीम आणि मुस्लिम बांधवांनाही शुभेच्छा. भारतातील मुस्लीम बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या टीमसोबत होत्या. केवळ भारतात नाही, तर जगभरातील मुस्लीम बांधव पाकिस्तानच्या टीमच्या पाठीशी होते, असे शेख रशीद यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, शेख रशीद मोठ्या आशेने भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना पाहण्यासाठी युएईला गेले होते. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख रशीद यांना युएईहून माघारी बोलावले. रशीद यांना पाकिस्तानमध्ये उद्भवलेल्या सध्याच्या हिंसात्मक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी बोलविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. इम्रान खान मोठे दावे करत असले तरी इस्लामाबादमध्ये सारे काही ठीक नाही. यामुळेच सध्याच्या असुरक्षित स्थितीवर मात करण्यासाठी इम्रान यांनी शेख रशीद यांना लगेचच माघारी बोलावले. शेख रशीद यांनी सामना पाहायला जाण्यापूर्वी इम्रान खान यांची परवानगी घेतली होती. मात्र, परिस्थिती झपाट्याने बदलली की, त्यांना दुबईत पोहोचत नाहीत, तोच पुन्हा मागे बोलविण्यात आले.