ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 07 - नेपाळमधील ज्येष्ठ नेते आणि नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देऊबा यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ बुधवारी घेतली. शेर बहादूर देऊबा नेपाळच्या पंतप्रधानपदी चौथ्यांदा विराजमान झाले आहेत.
आज दुपारच्या सुमारास राष्ट्रपती सचिवालयात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी शेर बहादूर देऊबा यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली.
काल नेपाळच्या संसदेत झालेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत शेर बहादूर देऊबा यांना 388 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ170 मतांवर समाधान मानावे लागले.
गेल्या महिन्यात माओवादी नेते पुष्प कमल दहल ऊर्फ प्रचंड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नेपाळचे पंतप्रधानपद रिक्त झाले होते. तसेच देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. नेपाळचे पंतप्रधानपद भूषणवण्याची शेर बहादूर देऊबा यांची ही चौथी वेळ आहे. याआधी त्यांनी 1995 ते 97. 2001 ते 02 आणि 2004 ते 05 या काळात देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. दरम्यान, शेर बहादूर देऊबा हे 1991 मध्ये दादेलधुरा जिल्ह्यातील पहिले संसद सदस्य म्हणून निवडून आले होते.
Sher Bahadur Deuba sworn in as the 40th Prime Minister of Nepal. pic.twitter.com/3kpKmwVp3i— ANI (@ANI_news) June 7, 2017