ठळक मुद्देपर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही इथिओपियातील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मृतांमध्ये गर्ग यांचा समावेश असल्याची माहिती दिली.विमान कोसळून तब्बल 157 प्रवाशांचा मृत्यू झाला.
नैरोबी - इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून नैरोबीला निघालेले इथिओपियन एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाल्याची घटना रविवारी (10 मार्च) समोर आली आहे. या विमानातून 149 प्रवासी आणि 8 कर्मचारी प्रवास करत होते. विमान कोसळून तब्बल 157 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही इथिओपियातील विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मृतांमध्ये गर्ग यांचा समावेश असल्याची माहिती दिली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी मदत जाहीर केली आहे. सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
इथिओपिया एअरलाइन्सचे हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून 38 मिनिटांनी आदिस अबाबा येथून नैरोबीकडे रवाना झाले होते. दरम्यान, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाशी असलेला संपर्क तुटला. दरम्यान, अपघातग्रस्तांसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. आदिस अबाबापासून 60 किमी अंतरावर असलेल्या बिशोफ्टू येथे हा अपघात झाला आहे. ज्या विमानाला अपघात झाला आहे ते 737-800 मॅक्स प्रकारातील होते. दरम्यान, इथिओपियाच्या पंतप्रधानांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विमान दुर्घटनेतील मृतांची नावेही प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबियांना सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश इथिओपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत.
'मी वैद्य यांच्या टोरंटोतील मुलाशी फोनवरुन चर्चा केली. मात्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील 6 व्यक्तींना गमावल्याचे कळताच आपल्याला खूपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इथिओपिया आणि केनयातील भारतीय दुतावासाशी संवाद साधत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितले आहे' अशी माहिती स्वराज यांनी दिली आहे.
इथिओपिया एअरलाइन्सच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथिओपिया एअरलाइन्सच्या या विमानातून जागतिक स्तरावरील एकूण 30 देशांचे प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांमध्ये केनियाचे 32, कॅनडाचे 18, इथोपियाचे 9, इटली, चीन आणि अमेरिकेचे 8, ब्रिटन व फ्रेंचचे 7, इजिप्त 6, डच 5, भारत व स्लोवाकियाचे 4, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि रशियाचे 3, मोरोकन्स, स्पॅनार्ड्स, पोल आणि इस्राइलचे 2 प्रवासी प्रवास करत होते. तर बेल्जियम, इंडोनेशिया, सोमालिया, नॉर्वे, सर्बिया, टोगो, मोझाम्बिया, रवांडा, सुदान, युगांडा आणि येमेन देशाचे काही नागरिक देखील या विमानातून प्रवास करत होते.