समीर परांजपे, मुख्य उपसंपादक
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे हे संसदीय निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण करत असताना ८ जुलै रोजी एका हल्लेखोराने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जगासाठी ही अतिशय धक्कादायक घटना होती. शिंजो आबे हे जपानचे विविध कालखंडात चार वेळा पंतप्रधान झाले होते. भारताविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यामुळेच मनमोहन सिंग व आता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आबे यांचे त्यांच्याशी छान मैत्र जुळले. आबे यांची हत्या करणारा तेत्सुया यामागामी याला शिंजो आबे यांचे राजकीय विचार पटत नव्हते. त्यांची हत्या झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आघाडीच्या बाजूने जपानमध्ये सहानुभूतीची लाट आली आणि त्या आघाडीला मोठा विजय मिळाला. माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आता आरोप होत आहे. आबे यांच्या हत्येच्या चौकशीत अमेरिकी तपास यंत्रणाही मदत करणार आहेत. त्यांच्या निधनामुळे भारताने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला होता. भारताने एक सच्चा मित्र गमावला आहे.
राजीव गांधी यांचा दुर्दैवी अंत
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाली. १९९१च्या लोकसभा निवडणुकांत तामिळनाडूतील श्रीपेरुम्बुदुर मतदारसंघामध्ये राजीव गांधी निवडणूक प्रचार करत होते. त्यावेळी एलटीटीईची महिला दहशतवादी तेनमोळी राजरत्नम हिने राजीव गांधी यांच्या पाया पडण्याचा आविर्भाव केला व शरीरावर गुंडाळलेल्या पट्ट्यात दडवलेल्या आरडीएक्सचा स्फोट केला. त्या आत्मघाती हल्ल्यात राजीव गांधी, हल्लेखोर व अन्य काही जण ठार झाले. १९८४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर अगदी आकस्मिकपणे राजीव गांधी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आली. श्रीलंकेत भारताने शांतीसेना पाठवल्याने एलटीटीईचा राजीव गांधी यांच्यावर रोष होता. या हत्या प्रकरणी इतर आरोपींना कालांतराने पकडण्यात आले. भारताच्या इतिहासात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.
महिला पंतप्रधानाची अखेर
पाकिस्तानचे दोनदा पंतप्रधानपद भूषविलेल्या बेनझीर भुत्तो यांची रावळपिंडी येथे एका निवडणूक प्रचारयात्रेत २७ डिसेंबर २००७ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या प्रमुख व तत्कालीन विरोधी पक्षनेत्या बेनझीर यांनी पाकिस्तानमध्ये जानेवारी २००८मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ही प्रचारयात्रा काढली होती. रावळपिंडी येथील लियाकत उद्यानामध्ये बेनझीर भुत्तो यांच्यावर गोळीबार तसेच आत्मघाती बॉम्बस्फोटही घडविण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या बेनझीर यांना तातडीने एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बेनझीर भुत्तो यांचे वडील व पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना पाकिस्तानमध्ये फाशी देण्यात आले होते. बेनझीर भुत्तो यांच्या हत्येनंतर ते आजवर पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्या पण तिथे आणखी एखाद्या महिलेला पंतप्रधानपद मिळाले असे घडले नाही. त्यामुळे बेनझीर भुत्तो म्हणजे पाकिस्तानच्या एकमेव महिला पंतप्रधान अशीच नोंद इतिहासामध्ये कायम आहे.