टोकियो : जपानच्या अर्थव्यवस्थेला शून्यातून बाहेर काढणारे आणि भारतासाठी मित्रासारखे राहिलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे (६७ वर्षे) यांची तेत्सुया यामागामी (४२ वर्षे) या हल्लेखोराने शुक्रवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे, या देशात बंदूक बाळगण्यासंदर्भात अत्यंत कडक कायदा असून, तिथे गुन्ह्यांचे प्रमाण तोकडे आहे. अशा देशात ही घटना घडल्याने जपानसह संपूर्ण जग हादरले आहे. आबे यांच्या निधनाबद्दल भारताने ९ जुलै रोजी राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचे ठरविले आहे.
तेत्सुया यामागामी या हल्लेखोराने आबे यांच्या पाठीमागून केलेल्या गोळीबारानंतर ते जागीच कोसळले. त्यांना तत्काळ काही उपचार देण्याचेही प्रयत्न झाले. त्यावेळी त्यांचा श्वासोच्छवास व हृदयक्रिया बंद पडली होती असे वैद्यकीय तज्ज्ञांना जाणवले. आबे यांना हेलिकॉप्टरद्वारे तातडीने नारा वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. तिथे त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्तपुरवठा करण्यात आला.
आबे यांची हृदयक्रिया पुन्हा सुरू व्हावी म्हणून उपचार सुरू होते. नारा वैद्यकीय विद्यापीठाच्या रुग्णालया डॉक्टरांनी आबे यांचे प्राण वाचविण्यासाठी सहा तास शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यात यश येऊ शकले नाही. उपचारादरम्यान आबे यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता.
कुठे घडली घटना वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ काउन्सिलर्ससाठी रविवारी निवडणुका आहेत. त्याकरिता आबे यांची नारा शहरात प्रचारसभा आयोजिण्यात आली होती. त्याचवेळी हा हल्ला झाला.
काय घडले ? आबे यांनी प्रचारसभेत भाषण सुरू करताच काही मिनिटांमध्ये पाठीमागून यामागामी या हल्लेखोराने गोळ्या झाडल्या.
का केली हत्या ? आबे यांच्या धोरणांवर नाराज असल्यामुळेच हल्लेखोराने त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात आले.
हल्लेखोराने काय वापरले ? हल्लेखोर यामागामीने डबल बॅरेलची हँडमेड गन यासाठी वापरली होती. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली असून गन जप्त केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.