मुंबई - पश्चिम आशियातील बेनिन किनाऱ्याजवळून एक व्यापारी जहाज बेपत्ता झाले आहे. या जहाजातील खलाशांमध्ये सुमारे 22 भारतीयांचा समावेश आहे. एमटी मरिन एक्स्प्रेस असे या जहाजाचे नाव आहे. पनामाचा ध्वज असलेले हे जहाज गुरुवारी बेपत्ता झाले असून, त्या जहाजाबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. या मालवाहू जहाजामध्ये गॅस ऑइल भरलेले होते. या जहाजाचा शोध घेण्यासाठी जहाज मालकांनी मुंबईमध्ये जहाजवाहतूक महासंचालकांची मदत मागितली आहे. तसेच कंपनीने शोधमोहीम सुरू करण्यासाठी नायजेरिया आणि बेनिनशीसुद्धा संपर्क साधला आहे. एमटी मरीन एक्स्प्रेस या जहाजाशी जहाज मालकांचा असलेला संपर्क 1 फेब्रुवारी रोजी तुटला होता. संपर्क तुटला तेव्हा हे जहाज बेनिनमधील कोटोनोऊ येथे होते. दरम्यान, शनिवारपर्यंत या जहाजाचा ठावठिकाणा लागला नव्हता. "आम्ही नायजेरियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना या संदर्भात माहिती दिली असून, तेथील तटरक्षक दल या जहाजाचा तपास सुरू करणार आहे, अशी माहिती डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग, मुंबईचे अतिरिक्त प्रभारी बी. आर. शेखर यांनी यासंदर्भात बोलताना दिली. हे जहाज पश्चिम आशियातील समुद्रामधून बेपत्ता झाल्याने सदर जहाजाचे अपहरण झाल्याची भीती व्यक्त करण्याच येत आहे. यादरम्यान नायजेरियाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातून प्रवास करणाऱ्या सर्व जहाजांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बेपत्ता जहाजामधील खलाशांमध्ये 22 भारतीयांचा समावेश असून, त्यांना अँग्ले ईस्टर्न शिप मॅनेजमेंट कंपनीने पाठवले होते. दरम्यान, सदर जहाजाचे मालक असलेल्या कंपनीने जहाज बेपत्ता झाल्याची माहिती शुक्रवारी ट्विटरवरून दिली होती. तसेच अँग्लो ईस्टर्न कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जहाज बेपत्ता झाले असून, जहाजामधील कर्मचाऱ्यांशी आपला संपर्क तुटल्याची कल्पना दिली आहे.
पश्चिम आशियामधून जहाज बेपत्ता, जहाजामधील कर्मचाऱ्यांमध्ये 22 भारतीय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 11:29 AM