ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.6 - उरी हल्ल्यातील शहीद जवानांचा अपमान केल्यामुळे ओम पुरींविरोधात देशभरातून हल्लाबोल सुरू आहे. हा वाद शमलेला नसतानाच, ओम पुरी यांनी शिवसेनेविरोधात टीका करत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीसंदर्भात पाकिस्तानी चॅनेलने ओम पुरी यांची फोनवरुन प्रतिक्रिया घेतली. यावेळी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत, त्यांच्या विरोधात असणा-या शिवसेनेला त्यांनी डिवचले आहे. 'शिवसेनेकडे आरडीएक्स नाही आणि एके 47 सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते काहीही वाकडे करू शकत नाही', असे म्हणत ओम पुरी आता शिवसेनेवर घसरले आहेत.
आणखी बातम्या
'पाकिस्तानी कलाकार वैध व्हिसाद्वारे भारतात येतात, त्यामुळे त्यांना घाबरण्याचे कारण नाही, वैध व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सुरक्षा पुरवू, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणीही पाकिस्तानी कलाकारांवर हल्ला करू शकणार नाहीत', असे देखील ओम पुरी म्हणाले आहेत. ओम पुरी यांनी शिवसेनेसंदर्भात केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओम पुरींवर शिवसेना कशा पद्धतीने शाब्दिक बाण सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.