ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. २० - शिवसेना राक्षसाचे रुप धारण करत असून त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी सरकारने या पक्षावर कारवाई केली पाहिजे असे मत पाकिस्तानमधील वृत्तपत्राने मांडले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने आक्रमकपणे पाकिस्तानविरोधात भूमिका घेतली आहे. गुलाम अली यांचा शो, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांचा पुस्तक प्रकाशानाचा कार्यक्रम आणि भारत - पाकिस्तान क्रिकेट मालिकेला शिवसेनेने अत्यंत आक्रमकपणे निषेध दर्शवला होता. या घटनेचे पडसाद पाकमध्येही उमटत असून पाकिस्तानमधील वृत्तपत्र द न्यूज इंटरनॅशनलने शिवसेनेवर संपादकीयच लिहीले आहे. 'शिवसेनेचा दहशतवाद नियंत्रणाबाहेर जात असून यापूर्वीही हा पक्ष अस्तित्वात होता. पण अशाप्रकारची दहशत त्यांनी कधीच निर्माण केली नव्हती असे यात म्हटले आङे. शिवसेना सत्ताधारी भाजपाचा मित्रपक्ष असून शिवसेनेसंदर्भात सरकारकडून उत्तर देण्यास होणा-या विलंबामागे हेच प्रमुख कारण आहे असा दावाही या वृत्तपत्राने केला आहे. गेल्या काही दिवसांमधील घटनांमुळे भारत - पाकमधील संबंध पूर्वी पेक्षा जास्त ताणले गेले असून दिल्लीतील केंद्र सरकारने देशाची प्रतिमा अबाधित ठेवण्यासाठी या पक्षावर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणीही संपादकीयमधून करण्यात आली आहे.