ऑनलाइन लोकमत
वॉशिंगटन, दि 29 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना अमेरिकेच्या सिनेटने जबरदस्त झटका दिला आहे. ओबामा यांनी 9/11 हल्ल्यासंदर्भातील विधेयकावर लावलेला व्हेटो अमेरिकी सिनेटने बहुमताने रद्द केला आहे. या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईकांनी सौदी अरेबियाविरोधात खटला दाखल करता यावा, यासाठी अमेरिकी सिनेटने विधेयक पारित केले होते. मात्र याविरोधात ओबामा यांनी व्हेटो जारी केला होता.
पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सिनेटच्या सदस्यांनी ओबामा यांनी जारी केलेला व्हेटो बहुमतानं रद्द केला. यामुळे आता 9/11 हल्ल्ल्यातील पीडितांच्या नातेवाईकांना सौदी अरेबियाविरोधात खटला दाखल करता येऊ शकणार आहे. ओबामा यांच्या व्हेटोविरोधात झालेले मतदान ओबामा आणि सौदी अरेबियासाठी मोठा झटका मानला जातो आहे. या विधेयकामुळे अमेरिकेसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, असं ओबामा यांचे म्हणणे आहे.
याआधी ओबामा यांनी 12 वेळा वीटो जारी केला. मात्र, ओबामा यांच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लागू केलेला वीटो अमेरिकी काँग्रेस आणि सिनेटने रद्द केल्याची ही पहिलीच घटना आहे.
9 / 11 हल्ल्याच्या प्रकरणात राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हेटो जारी केला होता. त्यामुळे अमेरिकींना सौदीच्या आरोपींवर खटला दाखल करता येणार नव्हता. 19 पैकी 15 सौदी अरेबियाचे नागरिक आहेत.