फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र ऑलिम्पिकला सुरुवात होण्यापूर्वी पॅरिसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका २५ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिलेवर कथितपणे ५ जणांनी बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. समोर येत असलेल्या वृत्तानुसार ही घटना १९ जुलै रोजी मध्यरात्री घडली होती.
या घटनेशी संबंधित एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये पीडित महिला या घटनेनंतर एका दुकानामध्ये जाऊन मदत मागताना दिसत आहे. त्यामध्ये तिचे कपडे फाटलेले दिसत आहेत. तसेच ती मदतीसाठी विनवणी करत आहे. तर दुकानातील कर्मचारी आणि ग्राहक तिला दिलासा देताना दिसत आहेत. त्याचदरम्यान एक व्यक्ती दुकानात आली. तेव्हा महिलेने तो हल्लेखोरांपैकी एक असल्याचा दावा केला. तेव्हा त्याने या महिलेवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातील इतर लोकांनी विरोध केल्याने तो पळून गेला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पीडित महिला ही फिरत होती, तसेच तिने थोडं मद्यपानही केलेलं होतं. तेवढ्यात तिला पाच जणांनी घेरलं. हे पाचही जण आफ्रिकन वंशाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पीडित महिलेला फ्रान्समधील ऑस्ट्रेलियन दुतावासाच्या माध्यमातून मदत देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ऑस्ट्रेलियन दुतावासाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पॅरिसमधील सरकारी वकिलांच्या कार्यालयाने सांगितले की, पोलीस २५ वर्षांच्या ऑस्ट्रेलियन महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपाचा तपास करत आहेत. मागच्या आठवड्याच्या अखेरीस ही घटना घडली होती. दरम्यान, शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.