Russia-Ukraine : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहेत. यामध्ये एक सैनिक दुसऱ्या देशाच्या सैनिकाचा चाकूने शिरच्छेद करताना दिसतोय. ठार झालेला सैनिक युक्रेनसाठी लढत होता, तर त्याला मारणारा सैनिक रशियाचा असल्याचा दावा केला जातोय. प्राण गमावलेल्या सैनिकाने हातात पिवळा बँड घातला होता, जो युक्रेनचे सैनिक घालतात. यावरुनच त्याची ओळख पटवली जात आहे. व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.
व्हायरल व्हिडिओ अस्पष्ट असून, सुरुवातीला आवाज ऐकू येत आहे. हल्ल्यानंतर पीडित सैनिक जिवंत असल्याची माहिती यावरुन समजते. या प्रकरणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ शेअर करून आपले म्हणणे मांडले आहे. 'ही अशी गोष्ट आहे, ज्याकडे जगातील कोणताही देश दुर्लक्ष करू शकत नाही,' असे ते म्हणाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाचे समर्थन करणाऱ्या टेलिग्राम चॅनेलने या आठवड्यात दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये रशियन सैनिक युक्रेनच्या युद्धकैद्याचा शिरच्छेद करताना दिसत आहेत आणि नंतर ते आनंदोत्सव साजरा करतात. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने या व्हिडिओला 'भयंकर' म्हटले आहे.
ISIS शी तुलनायुक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी या व्हिडिओचे वर्णन 'भयानक' असे केले आहे. त्यांनी ट्विट केले की, 'आयएसआयएस पेक्षाही वाईट असलेला रशिया यूएनएससीचे अध्यक्षपद भूषवत आहे, हे मूर्खपणाचे आहे.' रशियाला रोटेशनच्या आधारावर या महिन्यात UNSC चे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. कुलेबा म्हणाले, 'रशियन दहशतवाद्यांना युक्रेन आणि यूएनमधून बाहेर फेकले पाहिजे आणि त्यांना गुन्ह्यांना जबाबदार धरले पाहिजे.' 2014-2017 दरम्यान, ISIS ने इराक आणि सीरियामध्ये कैद्यांचा शिरच्छेद करुन व्हिडिओ जारी केले होते. यातून त्यांना आपली भीती कायम ठेवायची होती.