बांगलादेशमधून आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे. विद्यार्थ्यांनी सुरु केलेले आंदोलन आता आणखीनच हिंसक बनू लागले असून शेख हसीना यांनी राजीनामा देऊनही काही शांत होऊ शकलेले नाहीय. विद्यार्थी नेत्यांनी आंदोलन हायजॅक होण्याची भीती व्यक्त केली होती आणि आता तेच होऊ लागले आहे. सत्ताधारी अवामी लीगच्या नेत्यांवर हल्ले केले जात असून देशभरातून २० अवामी लीगच्या नेत्यांचे मृतदेह सापडले आहेत.
अवामी लीगच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आणि उद्योग धंद्यांवर हल्ले केले जात असून लुटालुट सुरु आहे. यामुळे अवामी लीगच्या नेत्यांमध्ये पळापळ सुरु झाली आहे. दोन मंत्र्यांना विमानतळावरून देश सोडण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेण्यात आले आहे. काही नेते रविवारी रात्रीच पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
दरम्यान, बांगलादेशचा प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचे ढाक्यातील धानमंडी भागातील १४० वर्षे जुने घर दंगेखोरांनी जाळले आहे. जाळण्यापूर्वी या घरात लुटालुट करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेता शांतो खान आणि त्याच्या वडिलांना जमावाने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली आहे. अभिनेता शांतो खानचे वडील सलीम खान हे चांदपूर सदर उपजिल्हाच्या लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते. ते चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकही होते. या दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.
नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांनी मंगळवारी रात्री दिली. या बैठकीला तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर अंतरिम सरकारमधील इतर सदस्यांना अंतिम रूप दिले जाईल, असेही सांगण्यात आले. युनूस हे सध्या देशाबाहेर आहेत. युनूस यांना २००६ मध्ये ग्रामीण बँकेच्या माध्यमातून दारिद्र्यविरोधी मोहिमेसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.