बिजिंग : चीनमधील हेनान प्रांतात असलेल्या किंडरगार्टनमधील एका शिक्षिकेने 23 मुलांच्या जेवणात कथितरित्या नायट्रेट मिसळल्यामुळे विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला ताब्यात घेतले आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, जिआओजुओच्या मेंगमेंग किंडरगार्टनमध्ये 25 मार्चला हा प्रकार घडला. किंडरगार्टनमध्ये मुलांना विषबाधा झाल्यानंतर उलट्या व मळमळीचा त्रास होऊ लागला. या घटनेनंतर मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही मुलांना सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अद्याप काही मुलांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, याप्रकरणी किंडरगार्टनमधील शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.