कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियमध्ये एका पार्कमध्ये उभारलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी मोडतोड केली आहे. महत्वाचे म्हणजे 2016 मध्ये मोदी सरकारने हा पुतळा भेट म्हणून दिला होता. 27-28 जानेवारीला ही घटना घडली असून परराष्ट्र मंत्रालयाने देखील आज यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतीय दुतावासाने व भारतीयांनी हे हेट क्राईम असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर पकडून शिक्षा करण्याची मागणी केली आहे. जवळपास 6 फूट उंचीची आणि 300 किलो वजनाची ही प्रतिमा डेव्हीसतच्या सेंट्रल पार्कमध्ये उभारण्यात आली होती. आता ती खाली पाडण्यात आली आहे. खालून हा पुतळा कापण्यात आला आहे. तसेच चेहऱ्याची मोडतोड करण्यात आली आहे. 27 जानेवारीला पार्कचा कर्मचारी तेथून जात असताना पुतळा मोडल्याचे लक्षात आले. डेव्हीसचे सदस्य लूकस फ्रेरीश यांनी तपास करेपर्यंत पुतळा हटविण्यात आला आहे. हा पुतळा का पाडण्यात आला हे अद्याप तपास अधिकाऱ्यांना समजलेले नाही, असे सांगितले.
डेव्हीसचे पोलीस प्रमुख पॉल डोरोशोव यांनी सांगितले की, शहरातील एका समुदायासाठी हा पुतळा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा होता. अशामध्ये याची गंभीरता समजू शकतो. हा पुतळा भारत सरकारने डेव्हीसला दिली होती. भारतीय अल्पसंख्यांकांच्या संघटनांनी (OFMI) याचा विरोध केला होता, तसेच हा पुतळा हटविण्याची मागणी केली होती.
खलिस्तानी संघटनांवर आरोपफ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनलच्या गौरांग देसाई यांनी सांगितले की, भारतविरोधी आणि हिंदू विरोधी कट्टर संघटनांनी तसेच खलिस्तानी समर्थकांनी लोकांमध्ये द्वेषाचे वातावरण पसरविले आहे. या कृत्याची चौकशी हेट क्राईमम्हणून केली जावी. हे कृत्य केवळ महात्मा गांधीच नाही तर भारतीय आणि भारतीय अमेरिकन लोकांविरोधात केलेला गुन्हा आहे.
दुसरीकडे खलिस्तान समर्थक एका संघटनेने या कृत्यावर आनंद व्यक्त केला आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. 2020 च्या डिसेंबरमध्ये खलिस्तानी समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासासमोर असलेल्या गांधीजींच्या मूर्तीचे नुकसान केले होते.