Putin Health Condition: पुतिन यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा, 'या' गंभीर आजारांचा सामना करतायत रशियाचे राष्ट्रपती!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 11:08 AM2022-12-04T11:08:09+5:302022-12-04T11:09:13+5:30
आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत.
सध्या संपूर्ण जगात रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धा बरोबरच, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचीही जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चर्चेची प्रामुख्याने दोन कारणे आहेत, एक म्हणजे, युद्धासंदर्भातील त्यांची आक्रमक वृत्ती आणि दुसरे म्हणजे, त्यांची प्रकृती. माध्यमांतील विविध वृत्तांनुसार, सध्या पुतिन हे विविध आजारांमुळे त्रस्त आहेत. यामुळे, ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वत:ला दूर ठेवत आहेत. काही दिवसांपूर्वी व्लादिमीर पुतिन हे त्यांच्या निवासस्थानीच पायऱ्यांवरून खाली पडल्याचाही दावाही काही वृत्तांमुध्ये करण्यात आला होता.
अनेक आजारांनी ग्रस्त आहेत पुतिन? -
रशियातील राजकीय विश्लेषक व्हॅलेरी सोलोव्ही यांच्या मते, रशियाचे राष्ट्रपती एकाच वेळी अनेक आजारांचा सामना करत आहेत. ते कॅन्सर, पार्किन्सन्स डिसीज आणि स्किझोफेक्टिव्ह डिसऑर्डर शिवाय, इतरही काही आजारांनी त्रस्त आहेत. यामुळेच त्यांची प्रकृती झपाट्याने ढासळत चालली आहे. पुतीन यांच्या खराब प्रकृतीचा परिणाम त्यांच्या युक्रेन युद्धासंदर्भातील निर्णयांवरही होत आहे. व्हॅलेरी म्हणाले, की आजारपणामुळे पुतिन यांना युद्धासंदर्भातही योग्य निर्णय घेण्यास अशक्य होत आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीत माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु हेच बहुतांश निर्णय घेत आहेत.
चेहऱ्यावर सूज, हात आणि पायांचीही समस्या -
पुतिन यांच्या ताज्या छायाचित्रांच्या आधारे, त्यांच्या चेहऱ्यावर सूज असल्याचा आणि त्यांचे हात पाय थरथरत असल्याचा दावाही काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर या समस्या लपविण्यासाठी पुतिन त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान एखाद्या गोष्टीचा आधार घेताना दिसतात, असा दावाही करण्यात येत आहे. याच बरोबर, एका फुटेजमध्ये पुतिन चर्चमध्ये ओठ चावतानाही दिसत आहेत. यावरून ते असाध्य आजाराने ग्रस्त असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, क्रेमलिनने पुतीन यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठल्याही प्रकारचे अधिकृत माहिती जारी केलेले नाही.