ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 27 - घरात स्वयंपाक करण्याची जबाबादरी महिलांवरच असते, आणि त्यातही तो व्यवस्थित झाला नाही तर घरच्यांकडून ऐकून घ्यावं लागतं ते वेगळं. स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून अनेक घरात भांडणं होत असतात, पण फक्त आणि फक्त गोल चपाती बनवायला जमेना या क्षुल्लक कारणावरुन वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या मुलीचं वय होतं फक्त 12 वर्ष. मित्र, मैत्रिणींसोबत अंगणात खेळ मांडून खेळण्याच्या वयात अंगावर टाकलेली ही जबाबदारी आणि त्यातही चूक झाली तर माफी नाही अशी अवस्था झालेल्या या चिमुरडीचं आयुष्य होतं फक्त 12 वर्ष. पाकिस्तानमधील ही घटना आहे. या नराधम पित्याला अटक करण्यात आली असून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खालीद मोहम्मद असं या नराधमाचं नाव असून मुलीची हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह रुग्णालयाबाहेर टाकून दिला होता. आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने पोलिसांत मुलगी हरवल्याची तक्रार केली. त्याच्या या कृत्यात त्याचा मुलगा अबुजारही त्याच्यासोबत होता. आपली मुलगी जेवण आणण्यासाठी गेली होती ती परत आलीच नाही अशी खोटी तक्रार त्याने पोलिसांत केली.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आपणच तिची निर्घुण हत्या केल्याची कबुली दोघांनी दिली. तिला गोल चपाती बनवायला जमत नव्हतं म्हणून हत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. न्यायालयाने आरोपी पित्याला फाशीची शिक्षा सुनावली असून 5 लाखांचा दंडही ठोठावला आहे. 'इतक्या क्षुल्लक कारणावरुन आपल्या मुलीची इतक्या निर्घुणपणे हत्या करणा-याला माफी दिली जाऊ शकत नाही', असं न्यायालयाने म्हटलं आहे.