लिस्बन : पोर्तुगालमध्ये कोरोनावरील फायझर (Pfizer) लस घेतल्यानंतर 48 तासांच्या आत एका आरोग्य कर्मचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनिया असेवेडो ( Sonia Acevedo) असे या 41 वर्षीय महिलेचे नाव असून फायझर लसीचा डोस घेतल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मात्र, त्यांचा अचानक मृत्यू झाला. सध्या सोनिया यांचे शवविच्छेदन केले असून मृत्यूचे कारण शोधण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटननंतर फिनलँड आणि बल्गेरियातील अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचेही समोर आले आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, सोनिया या पोर्तो शहरातील पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी (Portuguese Institute of Oncology) येथे कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कोणताही गंभीर आजार किंवा साइड इफेक्ट्स झाले नाहीत आणि त्या निरोगी होत्या असे सांगण्यात येत आहे. सोनिया ठीक होत्या. त्यांना आरोग्यसंबंधी कोणतीही समस्या नव्हती. तसेच, त्यांना कोविडची लक्षणे नव्हती. एक दिवस आधी त्यांना कोरोनाची लस देण्यात आली होती, असे सोनिया यांचे वडील अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगीज डेली वृत्तपत्राला सांगितले. तसेच, सोनिया यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे मला उत्तर हवे आहे, असेही अबिलियो असेवेडो म्हणाले.
पोर्तुगाल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजीने असे निवेदन प्रसिद्ध केले आहे की, 30 डिसेंबर रोजी सोनिया यांना लस देण्यात आली होती आणि 1 जानेवारीला त्यांचा अचानक मृत्यू झाला. सोनिया यांच्या तब्येतीत लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसले नाहीत. मृत्यूचे कारण शोधण्यात येत आहे, परंतु सोनिया यांच्या हेल्थ रेकॉर्डनुसार त्यांची तब्येत ठीक होती.
दुसरीकडे, फिनलँडनंतर बुल्गारियामध्ये अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीचे दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. ड्रग्ज एजन्सीचे कार्यकारी संचालक बॉग्डन किरिलोव्ह यांनी सोमवारी सांगितले की, या लसीचे दुष्परिणाम 4 लोकांमध्ये दिसून आले. ज्या लोकांमध्ये लसीचे दुष्परिणाम दिसून आले त्यापैकी दोघांमध्ये वेदना झाल्याचे आढळले आणि दोघांना सुस्ती व त्यांच्या तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले.
यापूर्वी फिनलँडमध्येही पाच लोकांमध्ये गंभीर दुष्परिणाम दिसले. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात आपत्कालीनच्या वापरासाठी फायझरला मान्यताही दिली आहे. ब्रिटनमध्ये दोन आरोग्य कर्मचार्यांनाही या लसीचे दुष्परिणाम होण्याची तीव्र लक्षणे दिसली. यानंतर, फायझरने जगभरात अॅलर्जी असलेल्या रूग्णांसाठी कोरोना लस वापरण्यासंबंधी माहितीही जारी केली होती.