वॉशिंग्टन - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रम्प यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, इवाना ट्रम्प यांच्या मृत्युबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना ट्रम्प यांचा मृत्यू हा एका अपघातात गंभीर दुखापत झाल्याने झाला, अशी माहिती न्यूयॉर्कचे चीफ मेडिकल एक्झामिनर यांनी शुक्रवारी दिली. मात्र त्यांचा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.
७२ वर्षीय इवाना ट्रम्प यांचा मृत्यू मॅनहॅटन येथील घरातील जिन्यावरून पडून झाला आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. न्यूयॉर्क पोलिसांच्या प्रवक्त्याने ईमेलद्वारे एएफपीला सांगितले की, घटनास्थळावर इवान ट्रम्प यांना मृतावस्थेमध्ये पाहिले गेले. त्यांच्या शरीरात कुठलीही हालचाल होत नव्हती. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमागे कुठलाही घातपात दिसत नसल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इवाना ट्र्म्प यांच्या मृत्यूची घोषणा केली होती. आमची तीन मुले ही इवानासाठी अभिमान आणि आनंदाचे कारण होते, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प आणि इवाना यांचा विवाह १९७७ मध्ये झाला होता. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इवाना यांनी एकूण चार विवाह केले होते. त्यातील एक विवाह त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विवाहापूर्वी आणि दोन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर केले होते. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला ते वेगळे झाले होते.