मृत्यू कधी कुणावर कसा ओढवेल हे सांगता येत नाही. कुणाला कुठेही-कधीही मरण येऊ शकतं. याचंच उदाहरण असलेला एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एक कार रस्त्याने जात होती आणि अचानक एक विमान कावर येऊन आदळतं (Plane crash on car Video). त्यानंतर होतो मोठा धमाका.
ही घटना(Plane Accident) अमेरिकेच्या फ्लोरिडातील (Florida) आहे. येथील पेमब्रोक पाइन्स स्थित नॉर्थ पेरी एअरपोर्टहून या विमानाने उड्डाण घेतलं होतं. काही वेळानेच हे विमान रहिवाशी भागातील एका रस्त्यावर येऊन कोसळतं (Plane Crash). थेट एका कारवर येऊन पडतं.
मुलाला घेऊन जात होती महिला
जेव्हा हे विमान पडलं तेव्हा एक महिला कारने आपल्या चार वर्षीय मुलाला घरी घेऊन जात होती. हे विमान नेमकं या कारवरंच येऊन आदळलं. विमान जमिनीवर आदळलं आणि नंतर त्याने पेट घेतला. इंडिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार या कारमध्ये जो चार वर्षांचा मुलगा होता त्याला आणि त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
NBC नुसार, विमान असलेल्या पायलटचा आणि एका प्रवाशाचाही या अपघातात मृत्यू झाला. या अपघातून कारमधील महिला वाचली आहे. सध्या ती हॉस्पिटलमध्ये असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही महिला शिक्षिका आहे.
महिलेच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, 'ही घटना हृदय पिळवटून टाकणारा आहे. तुम्ही तुमचा दिवस संपवून आपल्या मुलासोबत जात असता आणि रस्त्यात ही घटना घडते'. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. विमान खाली कसं पडलं हे अजून समजलं नाही.