न्यूयॉर्क : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील एका प्रसिद्ध सेलिब्रिटी रेस्टॉरंटमध्ये सिंगर अनन्या बिर्ला आणि तिच्या कुटुंबियांसोबत वर्णद्वेष करण्यात आला. या रेस्टॉरंटमधून तिची आई, भावासह सर्वांना बाहेर काढण्यात आले. अनन्या ही दुसरी तिसरी कोणी नसून भारताचे प्रसिद्ध उद्योगपती आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे.
अनन्याने या प्रकाराची माहिती तिच्या ट्विटरवर शेअर केली. हे रेस्टॉरंट घोर वर्णद्वेषी आहे. आमच्यासोबत त्यांची वागणूक अत्यंत हीन होती. हे ठीक नाही झाले, असे तीने म्हटले आहे. ही घटना कॅलिफोर्नियाच्या स्कोपा रेस्टॉरंटमधील आहे. हे इटली-अमेरिकन रेस्टरॉ सेलिब्रिटी शेफ अँटोनिओ लोफासा याचे आहे.
अनन्या बिर्लाच्या सोबत तिची आई आणि कुमार मंगलम बिर्ला यांची पत्नी नीरजा आणि भाऊ आर्यमन यानेही या घटनेबाबत ट्वीट केले आहेत. गायिका असलेल्या अनन्य़ाने थेट रेस्टॉरंटचा मालक अँटोनिओला ट्विट करत सांगितले की, आम्हाला जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये तीन तास वाट पहावी लागली. इथे माझ्या आईला एका वेटरने वाईट वागणूक दिली. तसेच वर्णद्वेशी टीका केली. तर कुमार मंगलम बिर्ला यांच्या पत्नीने ट्वीट करत म्हटले हे खूप अपमानास्पद आहे. तुम्हाला कोणासोबतही असे वागण्याचा कोणताही अधिकार नाही.
कुमार मंगलम यांचा मुलगा आर्यमनने ट्विट करत म्हटले की, माझ्यासोबत असा प्रकार कधीच झाला नव्हता. या घटनेमुळे मला विश्वास बसला की वर्णद्वेष खरोखरच केला जातो. ट्विटरवर हा प्रकार उघड होताच लोकांनी रेस्टॉरंटवर टीका करण्यास सुरुवात केली. अनन्याला तर काहींनी हे रेस्टॉरंटच तुम्ही विकत घेऊन टाका, असा सल्ला दिला आहे. दुसरीकडे रेस्टॉरंटने असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. आयडी दाखविण्यावरून बाचाबाची झाली, मात्र नंतर सारे ठीक झाले व ते जेवण करून गेले, असे रेस्टरंटने म्हटले आहे.