Iran Security Forces Abused protestors: इराणमध्ये सप्टेंबर 2022 मध्ये 22 वर्षीय महसा अमिनीचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. या दरम्यान हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि सर्वांनी हिजाबचा निषेध केला. काही दिवसात या निषेध मोर्चाचे मोठ्या आंदोलनात रूपांतर झाले. या काळात इराण पोलिसांनी हजारो लोकांना अटक केली होती. यामध्ये महिलांसह पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश होता. या काळात पोलिसांच्या कारवाईत अनेकांचा मृत्यूही झाला. आता याबाबत अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा अहवाल (amnesty international report) समोर आला आहे. ज्यामध्ये धक्कादायक खुलासे झाले आहेत.
तुरूंगात सामुहिक अत्याचाराची आणखी ४५ प्रकरणे उघड
अहवालानुसार, इराणच्या सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी हिजाबला विरोध करणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले, त्यांच्यावर बलात्कार केला आणि त्यांचे शारीरिक शोषणही केले. पोलीस कोठडीत अधिकाऱ्यांनी महिलांसोबत क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अहवालात असे म्हटले आहे की अशी 45 प्रकरणे समोर आली आहेत ज्यात आंदोलकांवर सामूहिक बलात्कार किंवा लैंगिक शोषण झाले आहे.
कोठडीत महिलांवर बलात्कार
ऍम्नेस्टीचे सरचिटणीस, ऍग्नेस कॅलामार्ड यांच्या म्हणण्यानुसार, इराणमधील गुप्तचर आणि सुरक्षा एजंट्सने बलात्कार आणि इतर प्रकारच्या लैंगिक शोषणाद्वारे महिलांवर कसे अत्याचार केले आणि आंदोलकांना मानसिकरित्या इजा केली हे तपासात उघड झाले. यामध्ये 12 वर्षाच्या मुलांचाही समावेश आहे.
४५ पैकी १६ बलात्काराच्या घटना
लंडनस्थित अॅम्नेस्टी संघटनेने म्हटले आहे की, त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी इराणच्या अधिकाऱ्यांशी आपला तपास अहवाल शेअर केला होता, मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष बाब म्हणजे केवळ महिलाच नव्हे तर पुरुष व लहान मुलांवरही बलात्कार आणि शारीरिक शोषण झाले आहे. अहवालात नोंदवलेल्या ४५ प्रकरणांपैकी १६ बलात्काराच्या घटना होत्या, ज्यात सहा महिला, सात पुरुष, एक १४ वर्षांची मुलगी आणि दोन १६ वर्षांच्या मुलांचा समावेश होता.
१० सिक्युरिटी एजंट्सने केले सामूहिक बलात्कार
एकूण प्रकरणांपैकी चार महिला आणि दोन पुरुषांवर १० पुरुष एजंट्सने सामूहिक बलात्कार केल्याचे अहवालात म्हटले आहे. ज्या लोकांनी हे सर्व केले त्यात रिव्होल्युशनरी गार्ड, निमलष्करी दल, गुप्तचर मंत्रालयाचे एजंट्स तसेच पोलीस अधिकारी यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून हा अंगावर काटा आणणारा गुन्हा केल्याचे या अहवालात म्हटले आहे.