सध्या सगळीकडे सणासुदीचा काळ सुरु आहे. अशातच संतापजनक बाब समोर आली आहे. ईकॉमर्स कंपनी अॅमेझॉन ॐ अक्षर लिहिलेल्या डोअर मॅट म्हणजेच पाय पुसण्या विकत आहे. एवढेच नाही तर हिंदू देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रेही विकली जात असल्याचे उघड झाले आहे.
महत्वाचे म्हणजे ही विक्री भारतात करण्यात येत नसून परदेशांमध्ये या वस्तू विकल्या जात आहेत. यामुळे ट्विटरवर अॅमेझॉन बायकॉट करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. #BoycottAmazon हा हॅशटॅगवापरून परदेशातील भारतीयांनी अॅमेझ़ॉनवर टीकेची झोड उठविली आहे.
अॅमेझॉनवर याआधीही हिंदू देवतांच्या चित्रांची वस्त्रे, बूट विकल्याचे प्रकार घडले होते. यावेळीही भारतीयांनी विरोध केला होता. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थानांचे फोटो छापलेल्या वस्तू विकल्या जातात. यामध्ये हाफ पॅन्टपासून ते अंडरगारमेंटपर्यंत या छायाचित्रांचा वापर केला जातो. परंतू हिंदू संस्कृतीमध्ये हे कृत्य चुकीचे आहे. यामुळे परदेशातील अनेकांनी अमेझॉनविरोधात मोहिम उघडली असून अॅप अनइन्स्टॉल करायला सांगितले आहे. तर अनेकांनी त्या वस्तूंची विक्री बंद करून तातडीन त्या वस्तू हटविण्यची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरुन ट्विट करणाऱ्यांमध्ये परदेशात असणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. भारतामध्ये असे प्रोडक्ट विकले जात नसले तरी जगातील इतर देशांमध्ये असे प्रोडक्ट विकून हिंदू संस्कृतीचा अपमान केला जात असल्याचा आरोप अनेकांनी ट्विटवरुन केला आहे.