रियाध - सौदी अरेबियाने काल एक दहशतवाद्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्याची भारतातही चर्चा सुरू आहे. सौदी अरेबियाच्या या टेरर लिस्टमध्ये एकूण २५ नावे आहेत. ज्यामधील दोन भारतीय नागरिक आहेत. हे सर्व लोक हुती बंडखोरांशी संबंधित आहेत. तसेच त्यांना IRGC-QF चा पाठिंबा मिळालेला आहे.
सौदी अरेबियाने जाहीर केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीमध्ये नाव असलेल्या भारतीयांची नावे चिरंजीवी कुमार सिंह आणि मनोज सभरवाल अशी आहेत. याशिवाय या यादीमध्ये इतर २३ नावांचाही समावेश आहे. त्यातील काही लोक तर काही कंपन्यासुद्धा आहेत. सौदी अरेबियाच्या संरक्षण विभागाने सांगितले की, हे २५ लोक ज्यामध्ये चिरंजीवी कुमार सिंह आणि मनोज सभरवाल यांचा समावेश आहे. ते दहशतवादी गट हुतीसाठी आर्थिक व्यवहार करतात. त्यांच्यासोबत त्यांना IRGC-QF चा पाठिंबा मिळाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
IRGC-QF हा इराण सरकारचा भाग असल्याचे सांगितले जाते. IRGC-QF दहशतवादी आणि बंडखोर समुहांना पाठिंबा देते. या संघटनेवार दहशतवादी गटांना साधनसामुग्री, रसद, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिल्याचा आरोप आहे. ही संघटना मुख्यत्वेकरून मध्यपूर्व आणि दक्षिण आशियातील दहशतवादी गटांना मदत करते.
हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हुती बंडखोरांनी येमेन सरकारविरोधात गोरिल्ला युद्ध छेडलेले आहे. २०१४ नंतर या बंडखोरांनी सौदी अरेबिया आणि यूएईवरही ड्रोन हल्ले केले होते.
दरम्यान, सौदी अरेबियाने जारी केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतील दोन भारतीय असलेल्यांपैकी मनोज सभरवालचं नाव आधीही चर्चेत आलं होतं. तेव्हा अमेरिकेने इराणमधून चालणारे आर्थिक नेटवर्क आणि स्मगलिंग नेटवर्कवर निर्बंध घातले होते. त्यांच्यावर येमेनमधील हुती बंडखोरांना फंडिग केल्याचा आरोप होता. अल जझिराने दिलेल्या वृत्तानुसार मनोज सभरवाल एका सागरी वाहतूक कंपनीमध्ये मॅनेजर होता.
तर सौदीच्या यादीत समावेश असलेला दुसरा भारतीय चिरंजीवी कुमार सिंह हा एफझेडसी नावाच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. त्या कंपनीवर अमेरिकेने गेल्या महिन्यात निर्बंध घातले होते.