लाहोर - रुग्णालयात काम करणारे कम्पाउंडर डॉक्टर बनल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. पण एका रुग्णालयामध्ये चक्क सिक्युरिटी गार्डनेच डॉक्टर बनून एका ८० वर्षांच्या महिलेवर शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दरम्यान, या शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांनी या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पाकिस्तानमधील लाहोरमध्ये घडली आहे.
येथील शमीमा बेगम नावाच्या महिलेने दोन आठवड्यांपूर्वी पाठीवर झालेल्या जखमेवर ऑपरेशन करून घेतले होते. मात्र हे ऑपरेशन डॉक्टरने नव्हे तर मोहम्मद वाहिद बट नावाच्या सिक्युरिटी गार्डने केले. या सिक्युरिटी गार्डने हे ऑपरेशन एका सरकारी रुग्णालयात केले. लाहोरमधील मेयो रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हे एक मोठे रुग्णालय आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी कोण काय करतोय याची माहिती ठेवणे शक्य होत नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये एका सिक्युरिटी गार्डने शस्त्रक्रिया कशी काय केली, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्यादरम्यान, एक क्वालिफाईड टेक्निशन उपस्थित होता.
बेगम यांच्या कुटुंबाने ही शस्त्रक्रिया करण्यासाठी बट याला पैसे दिले. एवढेच नाही तर घावावर मलमपट्टी करण्यासाठी हा सिक्युरिटी गार्ड महिलेच्या घरीही गेला. मात्र जेव्हा रक्तस्त्राव होत राहिला. तसेच वेदना वाढत गेल्या. तेव्हा कुटुंबीय या महिलेला घेऊन रुग्णालयात आले. तिथे नेमकं काय झालंय हे त्यांना समजलं. आता लाहोर पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. अॅटॉप्सी रिपोर्टनंतर या महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला आहे हे स्पष्ट होणार आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार लाहोर पोलिसांचे प्रवक्ते अली सफदर यांनी सांगितले की, या प्रकरणी गार्डवर आरोप करण्यात आले आहेत. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. बट याने आपण डॉक्टर असल्याचे भासवले होते. तसेच तो याआधीही इतर रुग्णांच्या घरी गेला होता. मेयो रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बट याला दोन वर्षांपूर्वी रुग्णांकडून जबरदस्तीने वसुली केल्याच्या आरोपाखाली कामावरून काढून टाकण्यात आले होते. यापूर्वी मे महिन्यात एका व्यक्तीला लाहोर जनरल रुग्णालयात डॉक्टर असल्याचे भासवल्याने आणि सर्जिकल वॉर्डमध्ये रुग्णांकडून पैसे वसूल केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आले होते.