अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय वंशाच्या तरुणांच्या सातत्याने येणाऱ्या मृत्यूंच्या बातम्यांमुळे चिंता व्यक्त केली जात असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला आहे. मूळ भारतीय असलेल्या २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. समीर कामत असं मृत तरुणाचं नाव असून मागील वर्षभरात घडलेली ही पाचवी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियाना येथील पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या समीर कामतने ऑगस्ट २०२३ मध्ये मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते आणि त्याच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्वही होतं. २०२५पर्यंत डॉक्टरेट पूर्ण करण्याचं समीरचं लक्ष्य होतं. मात्र त्यापूर्वीच घात झाला आणि एका बागेत त्याचा मृतदेह आढळून आला.
समीरचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र आम्ही त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून लवकरच शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय विद्यार्थ्यांसोबत अमेरिकेत सातत्याने भयंकर घटना घडत आहेत. यापूर्वी पर्ड्यू विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या नील आचार्य या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आला होता. तसंच श्रेयस रेड्डी आणि विवेक सैनी या तरुणांचीही हत्या करण्यात आली आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे पालक चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.