मागील काही दिवसांपासून ब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यांवर एक विचित्र घटना घडत आहे. ही धक्कादायक घटना पर्यावरण संस्थेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. ब्रिटनमधील मरस्के आणि सॉल्टबर्न समुद्रकिनाऱ्यांवर खेकडे, कोळंबी, मासे यांसह हजारो सागरी प्राणी मृतावस्थेत वाहून येत आहेत. सध्या संस्था या मागचे कारण शोधत आहेत.
मिरर यूकेच्या वृत्तानुसार, मार्सेली येथील रहिवासी शेरॉन बेलने सांगितले की, ती दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बीचवर येते आणि अचानक तिला बीचवर समुद्री प्राण्यांचा ढीग दिसला. समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या या प्राण्यांची संख्या सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. या प्राण्यांना वाचवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या लोकांसोबत त्यांनी 4 तास काम केले आणि यातील काही जिवंत प्राण्यांना पुन्हा समुद्रात सोडले. 21 वर्षांपासून या परिसराजवळ राहणारे बेल सांगतात, मी यापूर्वी कधीही इतकी वाईट परिस्थिती पाहिली नव्हती. या प्राण्यांच्या संरक्षणासाठी कोणीच काही करत नाही.
एका पर्यावरण संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट, फिशरीज अँड एक्वाकल्चर आणि नॉर्थ ईस्टर्न इनशोअर फिशरीज कंझर्व्हेशन ऑथॉरिटीच्या भागीदारांसोबत समुद्रकिनाऱ्यांवर इतक्या मोठ्या संख्येने अचानक मृत्यू कशामुळे झाला हे शोधण्यासाठी काम करत आहोत. आम्ही पाणी, समुद्रातील गाळ, खेकडे इत्यादींचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवत आहोत, जेणेकरून या घटनेमागे प्रदूषण कारणीभूत आहे का, हे कळू शकेल.