वॉशिंग्टन : कोरोना संसर्गावर आतापर्यंत बनविलेली औषधे व लसी या आजाराच्या नव्या प्रकारच्या विषाणूंविरोधात कमी प्रभावी ठरत आहेत, असे एका पाहणीत आढळून आले आहे. नव्या प्रकारच्या विषाणूंमुळे साथ अतिशय वेगाने पसरत आहे. मात्र सध्या उपलब्ध लसींमुळे मूळ कोरोना विषाणूवर काही प्रमाणात नियंत्रण राखता आले आहे.‘नेचर मेडिसिन’ या नियतकालिकात या पाहणीसंदर्भात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. ही पाहणी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी केली आहे. या लेखात म्हटले आहे की, कोरोनाच्या मूळ विषाणूंविरोधात प्रभावी ठरलेल्या अँटिबॉडीज् नव्या विषाणूंवरील उपचारात काहीशा कुचकामी ठरत आहेत.
दक्षिण आफ्रिका, ब्रिटन, ब्राझीलमध्ये आढळलेले कोरोनाचे नव्या प्रकारचे विषाणू अधिक संसर्गशक्तीचे व वेगाने साथ पसरविणारे आहेत. मूळ विषाणूंचा संसर्ग झालेल्यांना अँटिबॉडीज् तसेच लसीपासून संरक्षण मिळाले आहे. मात्र नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूंपासून संरक्षण मिळण्यासाठी सध्याच्या लसी व औषधे कमी पडत आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व लस घेतल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरात किती अँटिबॉडीज् निर्माण होतात यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूंना रोखण्यासाठी आणखी कोरोना लसी भविष्यात विकसित कराव्या लागतील. त्यासाठी आता जगभरातील औषध कंपन्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.