डेनवर - अमेरिकेच्या कोलोरॅडोमधील एका शाळेत गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात आठ विद्यार्थी जखमी झाले असून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोलोरॅडोच्या डेनवरमधील एका शाळेत स्थानिक वेळेनुसार दोन वाजता गोळीबार करण्यात आला.
डगलस काऊंटीचे शेरीफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती ही चिंताजनक आहे. या गोळाबारात शाळेतील शिक्षक अथवा कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. एसटीईएम शाळेमध्ये 1850 विद्यार्थी शिक्षण घेतात. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असून याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी एक बंदूक देखील ताब्यात घेतली आहे.
याआधी उत्तर कॅलिफोर्नियातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच शाळेतील अनेक मुले जखमी झाली होती. पोलिसांनी बंदुकधारी हल्लेखोराचाही खात्मा केला होता. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला होता. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.