टॉयलेटमध्ये समोसा आणि इतर पदार्थ तयार करणाच्या आरोपात एक रेस्टॉरन्ट बंद करण्यात आलं आहे. हैराण करणारी बाब ही आहे की, रेस्टॉरन्टमध्ये गेल्या ३० वर्षांपासून हे काम सुरू होतं. स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना मिळाल्यानंतर रहिवाशी बिल्डींगमधील रेस्टॉरन्टवर छापा मारला आणि हा प्रकार उघडकीस आल्यावर ते बंद करण्यात आलं. ही घटना सौदी अरबच्या जेद्दा शहरातील आहे.
Gulf News ने स्थानिक मीडियाच्या हवाल्याने सांगितलं की, सौदी अरबमधील अधिकाऱ्यांनी नुकतंच जेद्दामधील एक रेस्टॉरन्ट बंद केलं. चौकशीतून समोर आलं की, रेस्टॉरन्टमध्ये साधारण ३० वर्षांपासून टॉयलेटमध्ये समोर आणि इतर पदार्थ बनवले जात होते. तिथे काम करणाऱ्या लोकांकडे कोणतंही हेल्थ कार्ड नव्हतं आणि ते कायद्याचं उल्लंघन करत होते.
रिपोर्ट्सनुसार, रेस्टॉरन्ट वॉशरूममध्ये नाश्ता आणि जेवणाचीही तयारी करत होतं. त्यासोबतच जेद्दा नगर पालिका अधिकाऱ्यांना आढळलं की, रेस्टॉरन्टने ज्या मीट आणि पनीरसारख्या पदार्थांचा वापर केला. त्यातील काही पदार्थ दोन वर्षाआधी एक्सपायर झाले होते. इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना तिथे कीटक आणि उंदीरही दिसले.
नगर पालिकेने सांगितलं की, त्यांनी अनेक अवैध रेस्टॉरन्ट सील केले आणि एक टनपेक्षा अधिक साहित्य ताब्यात घेऊन नष्ट केलं आहे. यावर्षी जानेवारीमध्ये जेद्दामधील एक Shawarma रेस्टॉरन्टही बंद केलं होतं. तेव्हा तिथे उंदीर आढळून आले होते.