वॉश्गिंटन - फ्लोरिडा येथील पाम बीचवर ट्रम्प गोल्फ क्लबच्या बाहेर रविवारी गोळीबारी झाल्याची घटना घडली आहे. यावेळी अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. या घटनेनंतर ट्रम्प गोल्फ कोर्सच्या आसपास एफबीआय आणि सीक्रेट सर्व्हिंस आढावा घेत आहेत. घटनेचा तपास FBI कडे सोपवण्यात आला असून ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न पुन्हा एकदा करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना रात्री २ च्या सुमारास घडली. माजी राष्ट्रपती यांच्यावर गोळीबारी केली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. ट्रम्प हे सुरक्षित आहेत. आम्ही या घटनेचा तपास करत आहोत असं त्यांनी माहिती दिली तर गोल्फमधील झाडांमध्ये एक एके ४७ आणि संशयिताला पकडण्यात आल्याचं ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरने म्हटलं आहे.
या गोळीबाराच्या घटनेत डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत. त्यांच्या फ्लोरिडा गोल्फ क्लबबाहेर २ लोकांमध्ये गोळीबार झाला अशी बातमी न्यूयॉर्क पोस्टनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. एफबीआय या घटनेचा बारकाईने तपास करत आहे. ही घटना माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचं दिसून येते. एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे एक स्कोपवाली एके ४७ आणि एक ग्रोप्रोही होता. बंदूकधारी ट्रम्प यांच्यापासून ३००-५०० मीटर अंतरावर होते. सीक्रेट सर्व्हिसने संशयितावर हल्ला केला आणि कमीत कमी ४ गोळ्या झाडल्या. हल्लेखोराने गोळीबार केला की नाही हे स्पष्ट नाही असं एफबीआयने त्यांच्या निवेदनात सांगितले आहे.
दरम्यान, वॉश्गिंटन पोस्टनुसार, जेव्हा ही घटना घडली तेव्हा ट्रम्प क्लबमध्ये गोल्फ खेळत होते. घटनेवेळी सीक्रेट सर्व्हिंस जवानांकडून त्यांना क्लबच्या एका होल्डिंग रुममध्ये नेण्यात आले. या गोळीबारीच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना ईमेल पाठवला आहे. त्यात म्हटलंय की, मी कधीही सरेंडर करणार नाही. माझ्या आसपास गोळीबारी झाली परंतु अफवांवर विश्वास ठेवू नका. मी सुरक्षित आणि ठीक आहे. कुणीही मला रोखू शकत नाही. मी कधीही सरेंडर करणार नाही असं ट्रम्प यांनी समर्थकांना म्हटलं.
"ट्रम्प सुरक्षित हे ऐकून बरं वाटलं"
या घटनेवर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आणि डेमोक्रेटिक राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी ट्विट केले. फ्लोरिडात माजी राष्ट्रपती ट्रम् आणि त्यांच्या मालमत्तेजवळ गोळीबाराची घटना मला ऐकण्यात आली. ट्रम्प सुरक्षित असल्याचं ऐकून मला बरं वाटलं. अमेरिकेत हिंसेसाठी कुठलीही जागा नाही असं कमला हॅरिस यांनी प्रतिक्रिया दिली.