प्रश्न - मी माझ्या मित्रासोबत अमेरिकेत सुट्टी घालवण्याचा बेत आखत आहे. त्यानं दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसासाठी अर्ज केला होता आणि त्याला तो मिळाला होता असं मला वाटतं. मी जर त्याचं नाव आणि जन्मतारीख तुम्हाला सांगितली, तर त्याचा व्हिसा वैध आहे की नाही, याची माहिती तुम्ही देऊ शकता का?
उत्तर - अमेरिकेच्या नियमांनुसार व्हिसाबद्दलची माहिती गोपनीय असते आणि त्या माहितीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमची असते. त्यामुळे अर्जदार किंवा त्याच्या वतीनं माहिती मागणाऱ्या व्यक्तीलाच व्हिसाबद्दलचा तपशील आमच्याकडून दिला जातो. भारत, अमेरिका किंवा इतर कुठल्याही देशातील मित्रानं, शेजाऱ्यानं किंवा बिझनेसशी संबंधित व्यक्तीनं व्हिसाबद्दल विचारणा केल्यास, आम्ही त्यांना नम्रपणे नकार देतो.
हाच नियम ट्रॅव्हल एजेंट्सनादेखील लागू आहे. आम्ही अर्जदाराची माहिती त्याच्या ट्रॅव्हल एजेंटला देत नाही. अमेरिकेच्या व्हिसा अर्ज प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराला ट्रॅव्हल एजंटची गरज भासत नाही. व्हिसासाठी अर्ज करतानाही अर्जदाराला ट्रॅव्हल एजंटची आवश्यकता नसते. अर्जदार त्यांच्या शंका थेट support-india@ustraveldocs.com या ईमेल आयडीवर पाठवू शकता किंवा (91-120) 484.4644 or (91-40) 4625.8222 या नंबरवर कॉल करून विचारू शकता. या नंबरवर तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी इंग्रजी, हिंदी, गुजराती, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू भाषेतून संवाद साधू शकता. प्रतिनिधींना कॉल केल्यानंतर अर्जदारानं स्वतःचा पासपोर्ट क्रमांक आणि जन्मतारीख त्यांना सांगावी.
तुमच्या मित्राच्या व्हिसाच्या वैधतेविषयी-व्हिसाची मुदत संपण्याची तारीख व्हिसावरच स्पष्टपणे नमूद केलेली असते. बहुतांश अमेरिकन बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा दहा वर्षांसाठी वैध असतात. या कालावधीत व्हिसाधारक कितीही वेळा अमेरिकेत येऊ शकतो. फक्त त्यानं B1/B2 व्हिसा ज्या कारणांसाठी देण्यात आला आहे, त्याच हेतूनं अमेरिकेत यायला हवं. उदाहरणार्थ, सुट्टी, व्यावसायिक परिषद किंवा वैद्यकीय उपचार. जर तुमच्या मित्राला 2 वर्षांपूर्वी B1/B2 व्हिसा मिळाला असल्यास, तो वैध असू शकतो. व्हिसाची वैधता संपण्यापूर्वी तो कधीही अमेरिकेत येऊ शकतो.