ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ७ - भारतात शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे द्यावेत की नको यावरुन वाद सुरु असतानाच डेन्मार्कच्या एका प्राध्यापकाने शाळांमध्ये पॉर्न दाखवायला हवे असा सल्ला दिला आहे. शाळांमध्ये पॉर्न दाखवल्यास विद्यार्थ्यांना पॉर्न फिल्म्स व वास्तवातील लैंगिक संबंध यातील फरक समजवता येईल व यामुळे ते कर्तव्यनिष्ठ व समजूतदार व्यक्ती बनू शकतील असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.
लंडनमधील एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृ्त्तानुसार डेन्मार्कच्या अलबोर्ग विद्यापीठातील प्राध्यापक ख्रिस्टीयन ग्रॉगार्ड यांनी एका जाहीर कार्यक्रमात शाळांमध्ये पॉर्न दाखवण्याचा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला आहे. आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देताना ग्रॉगार्ड म्हणतात, शाळेतील ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांना पॉर्न व्हिडीओज दाखवायला हवेत व याविषयी त्यांच्यासोबत भावनात्मक व सखोल चर्चा करावी. यामुळे त्यांना व्हिडीओत दिसणारे संबंध व प्रत्यक्ष जीवनातील संबंध यातील फरक समजेल. सध्या शाळांमध्ये दिले जाणारे लैंगिक शिक्षण अतिशय रटाळ असते. याऐवजी विद्यार्थ्यांना थेट पॉर्न दाखवून किंवा गमतीदार पद्धतीने लैंगिक शिक्षण द्यावे असे त्यांचे म्हणणे आहे.
डेन्मार्कमधील काही शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या तासात पॉर्न व्हिडीओज दाखवून त्यावर अभ्यासात्मक चर्चा केली जाते. पण डेन्मार्कमधील अनेक शाळांनी पॉर्नोग्राफी दाखवण्यास विरोध दर्शवला होता.